अग्निशमन दलाला अद्यायावत सोयीसुविधा पुरविण्याची गरज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी व्यक्त केली. काळबादेवी येथे शनिवारी लागलेली आग विझवताना जखमी झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या दोन्ही अधिकाऱ्यांवर सध्या ऐरोलीतल्या बर्न रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाचे अधिकारी जीवावर उदार होऊन आपले कार्य पार पाडत असतात. मात्र, पुरेशा सोयीअभावी त्यांचा अशाप्रकारे बळी जात असेल तर आता मुंबई महानगपालिकेला गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. त्यासाठी अग्निशामन दलाला भीषण आगीचा सामना करू शकणारी सर्व उपकरणे आणि व्यवस्था पुरविणे गरजेचे असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.
दरम्यान, बचावकार्य करत असताना गंभीर जखमी झालेले संजय राणे आणि महेंद्र देसाई या दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. संजय राणे हे अग्निशमन विभागामध्ये सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते तर महेंद्र देसाई हे भायखळ्याच्या केंद्राचे प्रमुख होते. काल रात्री बचावकार्यादरम्यानचं या दोनही अधिकाऱ्यांच्या अंगावर इमारतीचा भाग कोसळला, आणि त्याखाली हे अधिकारी दबले गेले होते.