मुंबईची खरी ओळख म्हणजे कुलाबा ते वांद्रे आणि त्यापुढे सुरू होतं मुंबई उपनगर. गेल्या काही दशकात हे उपनगरही झपाटय़ाने वाढलं आणि त्याचा विस्तार झाला थेट विरापर्यंत. अर्थातच त्यामुळे या उपनगराचाही केंद्रिबदू विकसित झाला आणि तो म्हणजे बोरिवली. संजय गंधी राष्ट्रीय उद्यानामुळे बोरिवली जागतिक नकाशावर आहेच पण आता बोरिवलीला पुन्हा एक नवीन ओळख मिळाली आहे. मनोहर सकपाळ यांच्या ‘भागिरथी समूहाने’ मत्स्यालयाच्या संकल्पनेवर आधारित भारतातील पहिलं उपाहारगृह ‘कॅफे हायड्रो’ येथे सुरू केलंय. फिशरीज या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या रुपेश सकपाळ आणि त्यांचे बंधू सागर सकपाळ यांच्या संकल्पनेतून ‘कॅफे हायड्रो’ साकारलंय. त्यामुळे या नावीन्यपूर्ण जागेची तुम्हाला सफर घडवून आणणं गरजेचं आहे.

पहिल्यांदाच माशांच्या प्रथिनांपासून तयार केलेले आणि आशिया खंडाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असलेले फिश हॉटडॉग, फिशबर्गर, फिश मोमोज, फिश बावसारखे चवदार पदार्थ चाखण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. इथला मेन्यूसुद्धा हटके आहे. व्हेज, नॉन-व्हेज होममेड डीप्स, मेस्सी बर्गर्स, फ्रॉम द बाम्बू बास्केट, सबविच, रॉक अ‍ॅन्ड रोल, मील कॉम्बो, ड्रिंक्स आणि डेझर्ट्स असे आठ वेगळे कप्पे करण्यात आलेत. ‘कॅफे हायड्रो’चे मुख्य शेफ सुरेश चुनारा यांच्या पोतडीतले मोजकेच परंतु मुंबईत इतर ठिकाणी खचितच खायला मिळतात असे पदार्थ येथे मिळतात.

इथल्या पदार्थाचे वेगळेपण स्टार्टरपासूनच लक्षात येतं. थायलंडवरून मागवलेल्या सोयाबीन बीन्सपासून तयार केलेलं एडामामे बीन्स हे सी-सॉल्ट आणि चिली गाíलक अशा दोन प्रकारात मिळतं. पण खरी सुरुवात यानंतर होते. सुरिमी हे ‘कॅफे हायड्रो’ची सुपर स्पेशॅलिटी आहे. समुद्रातील मासे आणि इतर खाण्याच्या पदार्थाच्या मांसापासून तयार केलेल्या पेस्टला सुरिमी असं म्हणतात. या सुरिमीपासून तयार केलेले तब्बल बारा पदार्थ इथल्या मेन्यूमध्ये आहेत. फिशी ऑनियन रिंग्स, स्पाइसी फिश-एन-नट्स पॉपर्स आणि थाई फिश केक हे कधीही न ऐकलेले पदार्थ तुम्हाला येथेच खायला मिळतील. परदेशातून मागवलेल्या विशिष्ट मिर्चीद्वारे तयार केलेली चटणी त्याची लज्जत आणखी वाढवते. स्टार्टरवरून तुम्ही जेव्हा पुढे सरकता तेव्हा मेन कोर्समध्ये सात वेगवेगळे कॉम्बो उपलब्ध आहेत. त्यात पुन्हा व्हेज, नॉन-व्हेज आणि रोटी, राईस असे पर्याय. रोटी कनाई हा कॉम्बो तर आवर्जून मागवण्यासारखा. इंडोनेशियन फ्लेकी पराठा हा बटाटा, चिकन अथवा फिश बॉल यापकी तुमच्या आवडीच्या करीसोबत सव्‍‌र्ह केला जातो. थाई ग्रीन करी कॉम्बो मागवताना भाज्या, चिकन किंवा कोलंबी असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. तब्बल साडेचारशे रुपये किलोच्या अतिशय चविष्ट अशा जॅस्मिन राईससोबत ही करी सव्‍‌र्ह केली जाते.

स्टार्टर आणि मेन कोर्ससोबतच ड्रिंक्स आणि डेझर्टमध्येही वेगळेपण राखण्याचा प्रयत्न केला गेलाय. मँगो चिली ब्लास्ट, मोजिटो, वेगवेगळे मिल्कशेक दिसायला आणि चवीलाही नक्कीच वेगळे आहेत. फक्त पोटभर खाण्यासाठी नाही तर कधीतरी फक्त या कॅफेचा फिल घेण्यासाठीही भेट द्यायला हरकत नाही. त्यावेळी तुम्हाला टपरी चहा किंवा कॉफी ऑर्डर करता येईल. विशेष म्हणजे हा चहा किटलीतून दिला जातो आणि सोबत ‘कॅफे हायड्रो’च्या बेकरीमध्ये तयार होणारी खारी, रस्क तसंच कॉफीसोबत कुकीज कॉम्ल्पिमेंटरी दिल्या जातात.

‘कॅफे हायड्रो’ तीन मजली असून प्रत्येक मजल्याची वेगळी थीम आहे. तळमजल्याला रेल्वेच्या डब्याला लूक देण्यात आलाय. जमिनीवर चक्क रेल्वे रूळ टाकण्यात आलेले असून संपूर्ण फ्लोअर काचेचा आहे. बसण्यासाठी ट्रेनच्या डब्यात ज्याप्रमाणे बोगी असतात, तशी सोय करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी गोलाकार जिना असून वर जातानाच्या वॉलवर हे कॅफे ज्यांनी तयार केलं त्या कामगारांचे काम करतानाचे फोटो लावण्यात आलेत. पहिल्या मजल्यावर मत्स्य बोगदा तयार करण्यात आलाय जिथे तुमच्या डोक्यावर आणि बाजूला पारदर्शी काचेतून खचितच भारतात पाहायला मिळणारे विविध रंगाचे आणि आकाराचे मासे विहार करताना दिसतात. दुसऱ्या मजल्यावर वॉल मत्स्यालय असून त्यामध्ये चिकलेट्स सोडण्यात आलेले आहेत. हे मासे चक्क तुमच्या हालचालींना प्रतिसाद देतात. एकूण तीन लेव्हलवर मिळून ऐंशीहून अधिक लोकांची बसण्याची सोय करण्यात आली असून वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी करण्यात आलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रेल्वे बोगी, टेबल-खुच्र्या, हाय सीटिंग, जमिनीवर मांडी घालून किंवा झोपाळा अशा कुठल्याही ठिकाणी बसू शकता. त्यामुळे पदार्थाचा आस्वाद घेता घेता आजूबाजूला पाहण्यासारखंही इथे बरंच काही आहे. ज्यातून पोटाची भूक शमण्यासोबतच मानसिक शांतताही मिळेल.

‘कॅफे हायड्रो’च्या शेजारीच दहा हजार चौरस फुटांच्या जागेत उभारलेला भारतातील सर्वात मोठा मत्स्य बोगदा म्हणजेच मत्स्यालय असून या ठिकाणी ३५० हून अधिक प्रजातींचे गोडय़ा आणि खाऱ्या पाण्यातील मासे आहेत. माशांसोबतच पाण्याखालील पन्नास प्रजातींच्या वनस्पतीदेखील येथे पाहावयास मिळतात. १५ ते २० प्रकारचे सुंदर पक्षी, फूटभर लांबीची घोरपड, घरात पाळता येणारा बेडूकही येथील खास वैशिष्टय़ म्हणता येईल. दहा निष्णात तज्ज्ञ या मत्स्यालयाची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी तनात आहेत. त्यामुळे कॅफेमध्ये खाऊन झाल्यावर रंगीबेरंगी मासे विकत घेण्याचा मोह झाला किंवा बोगद्यातील मासे पासून मासे खाण्याचा मोह झाला, तर दोन्ही पर्याय तुमच्याकडे येथे उपलब्ध आहेत.

कॅफे हायड्रो

* कुठे – एसपी टॉवर,  दत्तपाडा मार्ग, राजेंद्रनगर, बोरिवली (पूर्व), मुंबई- ६६

* कधी – सोमवार ते रविवार सकाळी ११ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत.