मुंबई हायच्या तेलविहिरी या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून त्याचा काटेकोर नकाशा मिळविण्याचा प्रयत्न पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राकडून सातत्याने होत असतो. किंबहुना म्हणूनच या परिसरावर भारतीय नौदलाची करडी नजर असते. मासेमारी करणाऱ्या कोळ्याला सातत्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही त्याने तिथून हटण्यास नकार दिला. देशसुरक्षेच्या पातळीवर नौदल कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तो मृत्युमुखी पडणार नाही, अशा पद्धतीने गोळीबार करणे देशसुरक्षेसाठी गरजेचे होते, असे प्रतिपादन भारतीय नौदलाच्या व्हाइस अॅडमिरल एस. पी. एस चिमा यांनी परिसंवादानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
चिमा पुढे म्हणाले, मुंबई हाय परिसरातील तेलविहिरींची काटेकोर माहिती मिळविण्याचे प्रयत्न शत्रूकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे मुंबई हायची सुरक्षा सर्वाधिक प्राधान्यक्रमावर आहे. त्याच्या सुरक्षेबाबतीत कोणताही हलगर्जीपणा देशाला परवडणारा नाही. किंबहुना यातील नौदलाचा उद्देश स्वच्छ आणि स्पष्ट होता. गोळ्या घालून मासेमारी करणाऱ्याचा प्राण घेणे हा उद्देश नव्हता हे घटनाक्रमावरूनच लक्षात येईल. कारण त्याचा बळी जाणार नाही तो केवळ जखमी होईल, याची काळजी नौदलाने घेतली. त्यानंतर नौदलानेच त्याला जखमी अवस्थेत समुद्रातून उचलून नौदलाच्याच आयएनएचएस अश्विनी या रुग्णालयात आणले. त्याला मारायचेच असते तर एवढे करण्याची काही गरज नाही. तो भारतीय होता म्हणून आम्ही ही काळजी घेतली. मात्र भारतीय असल्याचे भासवून घुसखोरी केल्याचे उदाहरण कसाबच्या निमित्ताने समोर आहे, त्यामुळे नौदल धोकाही पत्करू शकत नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे, असेही व्हाइस अॅडमिरल चिमा म्हणाले.