पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली पुढील पावसाळ्यात कार्यरत होईल. शहरातील हवामानाच्या नोंदी, नद्यांची पातळी, भरती-ओहोटी, भूभागाच्या नोंदी आणि पावसाचे पूर्वानुमान या आधारे पुराचे पूर्वानुमान देणारी यंत्रणा विकसित केली जात असून पुढील पावसाळ्यात त्याचा वापर नागरिकांना करता येईल.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय सचिव डॉ. एम. राजीवन यांनी शनिवारी मुंबई दौऱ्यात या प्रकल्पाचा आढावा घेतला. चेन्नई शहरासाठी अशा प्रकारची प्रणाली आयआयटी मुंबई, चेन्नई आणि हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने विकसित केली आहे. त्याच धर्तीवर मुंबईसाठी अशीच यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे राजीवन यांनी सांगितले. हवामान विभागामार्फत, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या यंत्रणेवर सध्या काम सुरू आहे.

पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देण्यासाठी स्थानिक पातळीवरील विविध नोंदींची गरज भासते. शहरातील नद्या, भौगोलिक परिस्थिती, तलाव, पाणी साचणारी ठिकाणे, भरती-ओहोटी या नोंदीचा वापर यामध्ये केला जाईल. पडलेल्या पावसाच्या नोंदी आणि पूर्वानुमान यांचा मेळ या इतर नोंदीशी घालून सहा ते ७२ तासांतील संभाव्य पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देता येईल, असे राजीवन यांनी या वेळी नमूद केले. यामध्ये जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम मॅपिंग (जीआएसएम) प्रणालीचा वापर होणार आहे. नागरिकांना हे पूर्वानुमान अ‍ॅपच्या माध्यमातून पाहता येईल. हे पूर्वानुमान दर पंधरा मिनिटांनी अद्ययावत केले जाईल.

शहरातील नद्यांपैकी मिठी नदीचा समावेश सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केला जाईल, असे हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. लोकांच्या सूचनांनुसार प्रणालीमध्ये सुधारणा, दुरुस्ती करण्यात येईल असे ते म्हणाले.

‘सी बॅण्ड’ रडार लवकरच

पुढील तीन महिन्यांत मुंबईत वेरावली, गोरेगाव येथे ‘सी बॅण्ड रडार’ बसवण्यात येईल, असे या वेळी डॉ. एम. राजीवन यांनी सांगितले. सुमारे ५०० मीटपर्यंतच्या हवामानातील बदलांचा वेध यामार्फत घेतला जाईल. यासाठी जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी बांधकाम सुरू असून हे रडार इस्रोच्या माध्यमातून बसवण्यात येईल. सी बॅण्ड रडार हे चक्रीवादळाबरोबरच गडगडाट करणाऱ्या ढगांचादेखील वेध घेईल. तसेच मुंबईसाठी चार ‘एक्स बॅण्ड रडार’ येणार असून, पुढील पावसाळ्यापूर्वी एक ‘एक्स बॅण्ड रडार’ कार्यरत होईल. तर उर्वरित तीन रडार त्यानंतरच्या तीन-चार महिन्यांत कार्यरत होतील. एक्स बॅण्ड रडार प्रामुख्याने गडगडाटासह पाऊस पाडणाऱ्या ढगांचा वेध घेण्याचे काम करेल. यापुढे हवामानाच्या पूर्वानुमानाबरोबरच त्यामुळे होणाऱ्या बदलाचा परिणाम त्या ठरावीक विशिष्ट भूभागावर काय होऊ शकतो (इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट) हे हवामान विभागामार्फत सांगण्यात येईल. सध्या जगात काही ठिकाणी अशा पद्धतीने हवामानाचे पूर्वानुमान देण्याची पद्धत अवलंबली जात असून, भारतीय हवामान विभागदेखील परिणामासह पूर्वानुमान देणार आहे. पुढील काळात टप्प्या टप्प्याने ही पद्धत देशभरात सर्वत्र अमलात आणली जाईल, असेही ते म्हणाले.