मुंबईतील माजी आमदार आणि काँग्रेस नेते राजहंस सिंह यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजहंस सिंह भाजपत सामील झाले असून त्यांच्याकडे मुंबई भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत दिंडोशी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले राजहंस सिंह यांचा २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून राजहंस सिंह काँग्रेसमध्ये फारसे सक्रीय नव्हते. राजहंस सिंह हे पक्षनेतृत्वावरही नाराज होते. शेवटी सोमवारी सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राजहंस सिंह यांचा उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव असून त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईत भाजपला फायदा होईल असे सांगितले जाते. राजहंस सिंह हे पूर्वी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावरही होते.

राजहंस सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मुंबई काँग्रेसला धक्का बसला आहे. मुंबईत काँग्रेसला गटबाजीने ग्रासले असून गटबाजी थांबवून पक्षातील गळती रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय कृष्णा हेगडे यांनी जानेवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.