मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात दाखविलेल्या विशेष स्वारस्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्याचे गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांनी यावेळी शीना बोरा तपासादरम्यान मारिया यांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली. शीना बोरा हत्याप्रकरणाचा छडा लावणे हे तपास अधिकाऱ्याचे काम होते, पोलीस आयुक्त म्हणून मारिया यांनी या तपासावर लक्ष ठेवणे, एवढेच त्यांचे काम होते. इंद्राणी मुखर्जीची चौकशी सुरू असलेल्या खार पोलीस ठाण्यात मारिया यांनी वारंवार जायला नको होते, असेही फडणवीस यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. काही दिवसांपूर्वी शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. राकेश मारिया यांनी जातीने तपास करून प्रचंड गुंतागुंतीच्या या हत्याप्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या होत्या. मात्र, शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात गरजेपेक्षा अधिक स्वारस्य दाखविणे मारियांना भोवल्याची चर्चा तेव्हा रंगली होती.
नरेंद्र मोदी आणि अरूण जेटली यांच्या बारामतीशी वाढत्या जवळीकीमुळे गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरू असणाऱ्या चौकशीवर परिणाम होईल का, असा प्रश्नही यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. मात्र, या राजकीय घडामोडींचा कोणताही परिणाम घोटाळ्यांच्या चौकशीवर होणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.