Advertisement

पार्सलला पाय लागल्याच्या भांडणातून डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण; चार शिवसैनिकांना अटक, दोघे फरार

जोरात पाऊस पडू लागल्याने हा डिलेव्हरी बॉय शिवसेनेच्या कार्यालायसमोरील छपराखाली उभा होता. तेव्हा त्याचा आणि शिवसेना कार्यकर्त्याचा वाद झाला

मुंबई पोलिसांनी मंगळवारी कांदिवलीमधील शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचाही समावेश आहे. या पाच जणांनी पोईसर येथे एका डिलेव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोनजण अद्याप फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

“समतानगर पोलीस स्थानकामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली पूर्व येथील जय हिंद चाळीमध्ये राहणाऱ्या राहुल शर्माने दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका ई कॉमर्स साइटसाठी आपण काम करतो असं शर्माने सांगितलं आहे. मंगळवारी हा तरुण पोईसरमध्ये डिलेव्हरीसाठी गेला असता जोरदार पाऊस पडू लागला. त्यावेळी त्याने पोईसरमधील शिवाजी मैदान येथे असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालायसमोरील छपराखाली आसरा घेतला,” असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा शिवसेना कार्यालयाच्या बाहेरील बाजूस उभा असतानाच शिवसेना कार्यकर्ता असणाऱ्या चंद्रकांत निनवे यांनी शर्माकडे असणाऱ्या पार्सवर पाय ठेवला. “शर्माने निनवे यांना त्या वस्तूंना पाय लावू नका, असं सांगितलं असता त्यांनी शर्माला शिवागाळ करण्यास सुरुवात केली. या शाब्दिक बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि निनवे यांनी अन्य पाच शिवसैनिकांच्या मदतीने शर्माला मारहाण केली,” अशी माहिती पोलीसांनी दिलीय. शर्माला डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कलमांअंतर्गत शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. “या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून दोघे अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

23
READ IN APP
X
X