महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये एका प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्यामुळे या गुन्ह्य़ात या आरोपीला तीन वर्षांचीच सजा होऊ शकणार आहे. या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाचपैकी एक आरोपी १७ वर्षांचा असल्याचा दावा सुरुवातीलाच त्याच्या आईने केला होता. परंतु रेल्वे पोलिसांनी एका गुन्ह्य़ात अटक करताना तो १८ वर्षांचा असल्याचे नमूद केले होते. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनीही त्याचे वय १८ वर्षे असल्याचे म्हटले होते. याच जोरावर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनीही सर्व आरोपी सज्ञान असल्याचे ठामपणे सांगितले होते. परंतु या आरोपीच्या नातेवाईकांनी त्याचा जन्मदाखला तसेच शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली. या सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर तो खरोखरच फेब्रुवारी १९९७ मध्ये जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर हाडाची चाचणी केली जाणार नाही. आम्ही त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे, असे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले.
दरम्यान, या पाचपैकी चार आरोपींना ५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीडित तरुणीचा पुरवणी जबाब नोंदविण्यात आला आहे. सुरुवातीला तिने दिलेली जबानी आणि आरोपींनी दिलेल्या जबानीतील घटनाक्रमात विसंगती आढळत होती. त्यामुळे तिचा नव्याने जवाब नोंदविण्यात आला आहे. हा जवाब नोंदविल्यानंतर आणखी तीन कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामध्ये कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांचा समावेश आहे.

वृत्तांकनास पोलिसांचा आक्षेप; न्यायालयाची मात्र ‘ना हरकत’
हे प्रकरण संवेदनशील असल्याने खटल्याचे वृत्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालावी, अशी मागणी पोलिसांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.  पोलिसांच्या या अर्जावर सुनावणी होईपर्यंत आणि न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना न्यायालयात प्रवेश दिला गेला नाही.
डीएनए चाचणीचे नमुने सकारात्मक
पाचही आरोपींच्या डीएनए चाचणीचे नमुने सकारात्मक आले आहेत. त्यामुळे या पाचही जणांनी बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपींच्या डीएनए चाचणीचा अहवाल कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सादर केल्यानंत ही बाब उघड झाली आहे. बलात्काराच्या प्रकरणात डीएनए चाचणीचा अहवाल महत्त्वाचा पुरावा मानला जातो. याबाबत अहमदाबाद तसेच दिल्ली येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळांच्या अहवालाचीही आम्ही वाट पाहत आहोत, असे रॉय यांनी सांगितले.

आरोपींवर अंडय़ांचा मारा
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा महिलांमध्ये असलेल्या संतापाचा उद्रेक शुक्रवारी न्यायालयाच्या परिसरात प्रत्ययास आला. वृत्तछायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना न्यायालयात आणण्यात आणले असता राजकीय पक्षांच्या काही महिला सदस्यांनी त्यांच्यावर अंडय़ांचा हल्ला केला. या सर्व प्रकाराबाबत गाफील असलेल्या पोलिसांमध्ये आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये या अचानक घडलेल्या घटनेमुळे गोंधळ उडाला आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यात वेळ गेला. या महिलांनी आरोपींना फासावर लटकविण्याच्या मागणीच्या घोषणा करीत परिसर दणाणून सोडला. हा गोंधळ कमी म्हणून दुसरीकडे या गोंधळाचे वृत्तसंकलन करताना वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराची बॅग पडली. बराच वेळ ती बॅग तशीच पडून राहिल्याने तिला बेवारस समजून त्यात बॉम्ब असल्याचा ओरडा करण्यात आला आणि बॉम्बच्या अफवेचा नवा गोंधळ या परिसरात सुरू झाला. तत्पूर्वी, चारपैकी केवळ कासीम बंगाली, विजय जाधव आणि सिराज रहमान खान या तिघांनाच पोलीस कोठडीसाठी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी उदय पडवळ यांच्यासमोर हजर करण्यात आले. या वेळी कासीमच्या आईनेही आपला मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात केला. तसेच त्याला या न्यायालयाऐवजी बाल न्यायालयामध्ये हजर करण्याची मागणी केली. परंतु बंगाली हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून गेल्या वर्षी त्याच्यावर गिरगाव न्यायालयात प्रौढ आरोपी म्हणूनच चोरीचा खटला चालविण्यात आल्याची बाब पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या सगळ्या बाबी तसेच सुनावणीदरम्यान त्याचे वर्तन हे अल्पवयीन मुलासारखे भासत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याच्या आईची मागणी फेटाळून लावली.