मात्र, देवनार कचराभूमीवर मास्क, सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

मुंबई : टाळेबंदीमुळे मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण सुमारे ३० ते ३५ टक्क्य़ांनी घटले आहे. तर करोनामुळे प्रतिबंधित केलेला परिसर, इमारतींमधील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून बाधित, संशयितांनी वापरलेले मास्क, हातमोजे आदी मानखुर्द येथील जैविक कचरा विघटन प्रकल्पात नष्ट करण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांनी वापरून टाकलेले मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचा कचरा इतर कचऱ्यासोबत देवनार कचराभूमीत जात असून त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यात येत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.

मोठय़ा सोसायटय़ांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याची सक्ती केल्यानंतर मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत दर दिवशी ६५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे कंपन्यांची कार्यालये, दुकाने आदी बंद आहेत. नागरिकांना घरातच बसावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जमा होणाऱ्या कचऱ्यात ३० ते ३५ टक्क्य़ांनी म्हणजेच सुमारे दोन हजार मेट्रिक टनाच्या आसपास कचरा कमी झाला आहे.

कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी करोनामुळे वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच करोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे पालिकेने अनेक परिसर, इमारती प्रतिबंधित केल्या आहेत. अशा ठिकाणचा कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यात येत आहे. प्रत्येक विभाग कार्यालयात कचरा वाहून नेण्यासाठी दोन वाहने उपलब्ध करण्यात आली असून एका वाहनात केवळ प्रतिबंधित परिसर, इमारतीमधील कचरा वाहूून नेण्यात येत आहे. या परिसरातील आरोग्याशी निगडित कचरा म्हणजे मास्क, हातमोजे, सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्या आदींची मानखुर्द येथील जैविक कचरा विघटन प्रकल्पात विल्हेवाट लावण्यात येत आहे. तर उर्वरित कचरा देवनार कचराभूमीत खड्डय़ात पुरण्यात येत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

सध्या अनेक मुंबईकर मोठय़ा प्रमाणावर मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. या वस्तू वापरून कचऱ्यात फेकून देण्यात येत आहेत. कचऱ्यासोबत याही वस्तू देवनार कचराभूमीत जात आहेत. मात्र त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नाही. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.