* रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा. लि.कडून रेल्वेला वीजपुरवठा सुरू
* आता मुंबईच्या रेल्वेसाठी गुजरातहून वीज खरेदीची गरज नाही
महाराष्ट्रातील चढय़ा वीजदरांमुळे मुंबईतील उपनगरीय सेवेसाठी गुजरातहून कमी दरांत वीज खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या रेल्वेला दाभोळच्या रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा. लिमिटेडने दिलासा दिला आहे. या कंपनीशी झालेल्या करारानुसार गुरुवारपासून या कंपनीची वीज रेल्वेला मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे रेल्वेला प्रतियुनिट २.५० ते ३.५० रुपये कमी खर्च येणार आहे. ही बचत प्रतिवर्षी ५०० ते ७०० कोटी रुपये एवढी प्रचंड असेल. त्यामुळे आता रेल्वेच्या महाराष्ट्रातील वाहतुकीसाठी गुजरातच्या विजेची गरज पडणार नाही.
रेल्वे मंत्रालयाच्या नियमावलीप्रमाणे रेल्वे प्रत्येक राज्यातील विद्युत महामंडळांकडून वीज विकत घेते. ही वीज कर्षण उपकेंद्रांद्वारे ओव्हरहेड वायपर्यंत पोहोचवली जाते. महाराष्ट्रात वीजदर चढे असल्याने रेल्वेला इतर राज्यांच्या तुलनेत मोठा फटका बसत होता. तसेच मुंबईतील उपनगरीय रेल्वेची विजेची गरज जास्त असल्याने येथील विजेचा वापरही जास्त होता. या बाबी लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त भार सांभाळणारे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी मुंबईसाठी गुजरातहून वीज विकत घेण्याचा मानस व्यक्त केला होता.
काही दिवसांपूर्वी रेल्वेने दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा. लि. या कंपनीसह वीज खरेदीचा करार केला होता. हा करार आता प्रत्यक्षात आला असून गुरुवारपासून या कंपनीची वीज रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये खेळू लागली आहे. या कंपनीद्वारे रेल्वेला दरवर्षी ३०० मेगाव्ॉट एवढी प्रचंड ऊर्जा मिळणार आहे. ही वीज मध्य, पश्चिम, दक्षिण मध्य आणि दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे यांच्या वाहतुकीसाठी खर्ची होणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी मध्य रेल्वेवर ३६, पश्चिम रेल्वेवर सहा, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेवर चार आणि दक्षिण मध्य रेल्वेवर एक अशी एकूण ४७ कर्षण उपकेंद्रे उभारण्यात आली आहेत. रेल्वेला प्रचलित दरांत मिळणाऱ्या विजेपेक्षा दाभोळहून येणाऱ्या विजेचे दर तब्बल अडीच ते साडेतीन रुपये प्रतियुनिट एवढे कमी आहेत. त्यामुळे दरवर्षी रेल्वेची ५०० ते ७०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेला गुजरातहून वीज खरेदी करण्याची काहीच गरज नसेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता राजीव अग्रवाल यांनी स्पष्ट केले.