जगभरातील सुरक्षित शहरांच्या यादीत टोकियोने पहिले स्थान पटकावले आहे. या यादीत मुंबई ४५ व्या, तर दिल्ली ४३ व्या स्थानावर आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटकडून ही यादी तयार करण्यात आली असून त्यासाठी तब्बल ४९ निकषांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल, आरोग्य, पायाभूत सुविधा, वैयक्तिक अशा विविध क्षेत्रांमधील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटकडून जगभरातील ६० प्रमुख शहरांमधील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. यासाठी ४९ विविध निकषांचा विचार करण्यात आला. या यादीत टोकियोनंतर सिंगापूर दुसऱ्या स्थानी असून ओसाका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी टोरन्टो आणि पाचव्या स्थानी मेलबर्न आहे. या यादीतील शेवटच्या दहा शहरांमध्ये दक्षिण आशियातील दोन शहरे (ढाका आणि कराची) आहेत. तर आग्नेय आशियातील तीन शहरांचा (मनिला, हो चि मिन्ह आणि जकार्ता) समावेश शेवटच्या दहा शहरांमध्ये समावेश होतो. याशिवाय मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील दोन शहरे (कैरो आणि तेहरान) तळाला आहेत.

‘शहरांमधील आर्थिक घडामोडी वाढल्या की तेथील सुरक्षेची आव्हानेदेखील वाढतात. शहराचे आर्थिक महत्त्व वाढल्याने तेथील लोकसंख्येचे प्रमाणदेखील वाढते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होतो,’ असे ख्रिस क्लॅग यांनी म्हटले. क्लॅग यांनी सुरक्षित शहरांची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ६० शहरांमधील विविध क्षेत्रांमधील सुरक्षेची एकूण स्थिती, त्याबद्दलची आकडेवारी यांचा अभ्यास करुन यादी तयार करण्याचे काम क्लॅग यांनी केले.

जगभरातील सर्वच देश आणि त्यामधील महत्त्वाच्या शहरांसमोर सध्या दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. लंडन, पॅरिस, बार्सिलोना या शहरांना दहशतवादी हल्ल्यांचा फटका बसला आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जाण्यास शहरे किती सक्षम आहेत, याचा विचार सुरक्षित देशांची यादी तयार करताना केला गेला. याशिवाय शहरातील असमानता आणि त्यामुळे निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न हा निकषदेखील यादी तयार करताना विचारात घेण्यात आला.