मुंबईतील घाटकोपर येथे चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. २८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर बचाव मोहिमेत सहभागी झालेले अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना या दुर्घटनेची चौकशी १५ दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीचे मालक शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, शितप शिवसेना पदाधिकारी नसल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.

शितपला फासावर लटकवा

..आणि ती भीती खरी ठरली

घाटकोपरमधील दामोदर पार्कजवळील साईदर्शन ही चार मजली इमारत जुनी झाली होती. मंगळवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास इमारत कोसळली. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले होते. थोड्या वेळाने अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. साईदर्शन ही इमारत ४० वर्षे जुनी होती. ही इमारत शिवसेना पदाधिकारी सुनील शितप याच्या मालकीची होती. इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे रुग्णालय होते. तळमजल्यावर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात येत होते. त्यामुळे इमारत कमकुवत होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या दुर्घटनेला जबाबदार धरत पार्कसाईट पोलिसांनी सुनील शितपविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. संध्याकाळी शितपला ताब्यात घेण्यात आले होते. शितप याने इमारतीच्या गाभ्याला धक्का पोहोचेल, असे बदल केले होते, अशी माहिती पुढे आली होती. अखेर पोलिसांनी शितप याला अटक केली आहे. चौकशीनंतर शितपला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तर २८ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून २८ जणांना बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आले आहे. त्यांना राजावाडी आणि शांतिनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजावाडीमधून दोन जण आणि शांतिनिकेतनमधून चार जखमींवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे.