‘बेस्ट’मधील कर्मचाऱ्यांच्या संपाने सलग चौथ्या दिवशी मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच घाटकोपर- वर्सोवा मार्गावरील मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली. सर्व प्रवाशांना एअरपोर्ट रोड स्टेशनवर उतरवण्यात आले असून पाच मिनिटात मेट्रो सेवा पूर्ववतही करण्यात आली. मात्र, यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या अडचणीत भर पडली.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच असून अशा परिस्थितीत प्रवाशांना मेट्रो आणि मोनो सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी मेट्रोमध्ये बिघाड झाला. मेट्रोमधील सर्व प्रवाशांना एअरपोर्ट रोड स्टेशनवर उतरवण्यात आले. मेट्रोतील तांत्रिक बिघाडामुळे ही ट्रेन रिकामी करण्यात आली. यानंतर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, बेस्टच्या वाहतूक विभागापाठोपाठ मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा पवित्रा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनो रेलचे १९८ कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत.