मुंबईतील मलबारहिल येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याशेजारील ज्ञानेश्वरी बंगल्याला आग लागली होती. ज्ञानेश्वरी बंगला हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे शासकीय निवासस्थान आहे. ज्ञानेश्वरी बंगल्यातील कर्मचारी निवासात रात्री ९ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. याबाबत माहिती मिळताच, तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून तासाभरात ही आग आटोक्यात आणली.

आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप कळालेलं नाही मात्र सीलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा आगीत कुणीही जखमी नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी खुद्द जलसंधारणमंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. त्यांनीही आग विझविण्यासाठी धावपळ केली.