मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला दोष देत एखादीनं नाद सोडून दिला असता आणि दुसरा फोन घेतला असता. परंतु मोबाईलचा नाद सोडून न देता या शिक्षिका असलेल्या या तरूणीनं एखाद्या डिटेक्टिव्हच्या चिकाटीनं व गुगलच्या सेवांचा लाभ घेत मोबाईलचोराला पकडलं. बहाद्दर मुली काय करू शकतात याचा वस्तुपाठच तिनं घालून दिला आहे. झीनत बानू हक या मरोळमध्ये राहणाऱ्या तरूणीच्या कौतुकास्पद गुप्तेहरगिरीची बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.
अंधेरीमधील मरोळला राहणारी झीनत मालाडला काही कामासाठी गेली होती. परतल्यावर आपला स्मार्टफोन गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं आपला फोन कुणाच्या ताब्यात आहे आणि ती व्यक्ती काय करतेय हे ट्रॅक करायचं ठरवलं. दुसऱ्या हँडसेटचा तिनं त्यासाठी उपयोग केला. आपल्या गुगल अकाउंटमध्ये लॉगइन करून तिनं चोरीला गेलेल्या फोनचं लोकेशन ऑन केलं. तसंच गुगल अकाउंटमधल्या माय अॅक्टिविटीचा वापर करत त्या मोबाईलवर कुठल्या वेबसाईट्स बघितल्या गेल्या, व्हीडियो कुठले बघितले गेले, गुगलवर काय शोधलं गेलं आदींचा माग घेतला.
दुसऱ्या अँड्रॉइड फोनच्या सहाय्यानं तिनं चोरीला गेलेल्या फोनमधल्या अॅक्टिविटीजचा असा माग काढला. चोरानं रजनीकांतचा काला सिनेमासाठी सर्च केलं, त्यानं शेअरइट अॅप वापरलं, व्हॉट्स अॅप अपडेट केलं व फेसबुक वापरल्याचंही तिला समजलं. त्या चोरानं दादर – तिरुवनामलाई ट्रेनचं तिकिट बुक केल्याचं, पीएनआरचा फोटो काढल्याचं व स्वत:चा फोटो काढल्याचंही झीनतच्या लक्षात आलं. गुगल फोटोजच्या माध्यमातून झीनतनं त्याच्या तिकिटाच्या डिटेल्स मिळवल्या, तसंच त्याचा स्वत:चा काढलेला फोटोही तिला बघायला मिळाला. तो रविवारी रात्री 9.30 वाजता दादरवरून सुटणारी गाडी पकडणार असल्याची माहिती तिला ही गुप्तहेरगिरी करून मिळाली.
मग झीनतनं तडक दादर स्टेशन गाठलं आणि रेल्वे पोलिसांच्या कानावर हा सगळा तपास घातला. चोरलेल्या फोटोचा लोकेशन ऑप्शन अॅक्टिव्ह असल्यामुळे ती आपल्या फोनच्या म्हणजेच चोराच्या प्रवासाचाही माग घेतच होती. तो दादर स्थानकाजवळ आल्याचंही तिच्या लक्षात आलं. रेल्वे पोलिसांचं पथक उपस्थित होतंच. सदर ट्रेन दादर स्थानकात आली, तरीही तो चोर काही अद्याप आला नव्हता. शेवटी एकदाचा तो आला आणि आपल्या जागेवर बसला. लागलीच पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडे झीनतचा फोन सापडला, परंतु सेल्वराज शेट्टी असं नाव असलेल्या त्या तरूणानं हा फोन आपल्याकडे गहाण ठेवण्यात आल्याची बतावणी केली. मात्र, त्याच्या व त्याच्यासमवेत असलेल्या महिलेच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांच्या प्रश्नाच्या भडीमारापुढे त्याचं पितळ उघडं पडलं. अखेर गुगलच्या मदतीनं झीनत हकनं केलेल्या डिटेक्टिवगिरीचं चीज झालं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 2:30 pm