मुंबई : ‘करोना’ रोगाचा प्रतिबंध करणारी गादी, अशी आपल्या मालाची जाहिरात करणाऱ्या अरिहंत कंपनीला चाप लावण्यास ‘मुंबई ग्राहक पंचायती’ला यश आले आहे. या विरोधात भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे.

करोना प्रतिरोधक गादीवर झोपलात तर रोग पळून जाईल, अशी अतिरंजित जाहिरात अरिहंत कंपनीने काही वृत्तपत्रात केली होती. १५ हजार रुपये किमतीची ही गादी करोना प्रतिरोधक असल्याचा दावा या जाहिरातीत केला होता. करोना साथीमुळे भयभीत झालेल्या ग्राहकांची मानसिकता ओळखून आपले उखळ पांढरे करून घेऊ पाहणाऱ्या या जाहिरातीला मुंबई ग्राहक पंचायतीच्या डॉ. अर्चना सबनीस यांनी आक्षेप घेत ‘अ‍ॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया’ यांच्याकडे तक्रार केली. या कौन्सिलने तात्काळ दखल घेऊन जाहिरातदाराशी संपर्क साधला असता, आपण ही जाहिरात तत्काळ मागे घेत आहोत, असे कंपनीने कळविले. या कंपनीविरोधात भिवंडी येथील आरोग्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफवा पसरविणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : कोंबडय़ा, अंडी खाल्ल्याने करोना होतो, अशी अफवा समाजमाध्यमांवर पसरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकाला उत्तर प्रदेश तर दुसऱ्याला आंध्र प्रदेशात जाऊन पोलिसांनी अटक केल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी बुधवारी दिली. कुक्कूट उत्पादनाद्वारे करोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो, ही बाब पूर्णत: अशास्त्रीय व निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. समाजमाध्यमांवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन केदार यांनी केले आहे. केदार म्हणाले, करोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यूटय़ुबवर चिकन, अंडी यांच्या आहारातील समावेशाबाबत विविध अशास्त्रीय बाबी पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कुक्कूट खाद्य निर्मिती आणि कुक्कुट पालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे अफवा पसविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात आठवीपर्यंत परीक्षा रद्द

लखनौ : उत्तर प्रदेशात सर्व सरकारी प्राथमिक शाळांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून करोना विषाणूच्या प्रसार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच वरच्या वर्गात घालण्यात येणार आहे. शिक्षण खात्यातील अतिरिक्त मुख्य सचिव रेणुका कुमार यांनी याबाबत सांगितले की, प्राथमिक शाळांच्या परीक्षा २३ ते २८ मार्चदरम्यान होणार होत्या पण त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच वरच्या वर्गात घातले जाणार आहे. राज्य सरकारने मंगळवारी शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह, बहुपडदा चित्रपटगृहे, पर्यटनस्थळे २ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.