राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये मुंबईचाही समावेश आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या देशातील टॉप १० जिल्ह्यांमध्ये मुंबईदेखील आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने काही जिल्ह्यांनी शहरांमध्ये कडक निर्बंध लावले आहेत. मुंबईतदेखील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जमवाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत पुन्हा लॉकडाउन लागण्यासंबंधी चर्चा सुरु असून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

”लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण लॉकडाउन उठवला आहे. पुन्हा लॉकडाउन लावण्याच्या मनस्थितीत आपण नाही. पण आवाहन आपण करत राहतोय, लोकांना हे टाळू शकतो असं सांगत आहोत. पण जर लोकांचा जीव वाचवायचा की त्यांचा व्यवसाय, उत्पन्न वाचवायचं अशी परिस्थिती आली तर लोकांचा जीव कसा वाचवता येईल या मानसिकतेने सरकार प्रयत्न करत आहे,” असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

लॉकडाउनसंबंधी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या विरोधावर बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीने जे काही सांगितलं ते काही दुमत नाही. तुम्ही लॉकडाउनसाठी तयार राहा असं मुख्यमंत्री सांगत असून राष्ट्रवादी गरज नाही म्हणत आहे. तयारीत राहा म्हणजे लावणार असं नाही”. “तुम्ही जगात कुठेही पहा. आजही अमेरिकेतही अनेक ठिकाणी लॉकडाउन सुरु आहे. लंडनमध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला लॉकडाउन उठवलेला नाही. युरोप, स्पेनमध्ये, इटली येथेही पहा…काही ठिकाणी लॉकडाउन उठवण्यात आला आहे, तर काही ठिकाणी २४ तासांचा लॉकडाउन सुरु आहे,” असं यावेळी अस्लम शेख यांनी सांगितलं.

टास्क फोर्स ज्यापद्धतीने सूचना कऱणार त्याप्रकारे निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी लोकलच्या प्रश्नावर बोलताना दिली. मुंबईत रात्रीप्रमाणे दिवसाही निर्बंध लावणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मार्केट्स असतील, शॉपिंग मॉल किंवा किराणाची दुकानं जिथे लोक गर्दी करत आहेत तिथे बंधनं लावण्यात येऊ शकतात. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये असंच करण्यात आलं आहे. खऱेदीसाठी वैगेर वेळ देण्यात आली आहे”.

आयसीएमआरला पत्र लिहिणार
“आपल्याकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसऱ्या राज्यांमध्ये मात्र वाढत नाही. म्हणून आम्ही आयसीएमआरला मुंबई आणि महाराष्ट्रातच रुग्ण का वाढत आहेत यासंबंधी लिहिलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात रुग्ण वाढणं चिंताजनक आहे, पण इथेच का वाढत आहे? पश्चिम बंगालमध्ये पूर्ण जोराने प्रचार सुरु आहे, लाखोंच्या संख्येने लोक जमत आहेत. केरळमध्ये हीच परस्थिती आहे,” अशी शंका अस्लम शेख यांनी उपस्थित केली.

खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव
“मुंबई महापालिका आणि राज्य शासन कमी पडण्याचा काही प्रश्चच उद्धभवत नाही. आज मुंबईत रुग्ण वाढले असले तरी गरज हवी तेवढ्या जागा आहेत. महापालिका, राज्य शासन तसंच खासगी रुग्णालयांमध्येही जागा शिल्लक आहे. १६ हजारापेक्षा जास्त बेड महापालिकेकडे आहेत. त्यामधील अजून चार हजार बेड शिल्लक आहेत. आयसीयूमध्ये जागा आहे. व्हेटिलेटरमध्ये जागा आहे. खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव आहेत. तसंच ८० रुग्णालयांना महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलं आहे,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.

नवी जम्बो सुविधेची गरज नाही
“लसीकरण योग्य सुरु असून शासनाने अनेक ठिकाणी जम्बो सेंटर सुरु केले आहेत. यामध्ये पालिका किंवा राज्य सरकार कमी पडत आहे असं मला वाटत नाही,” असं यावेळी ते म्हणाले. “काही जम्बो सेंटर बंद केले होते, पण गरज लागली तर २४ तासात ते वापरु शकतो अशा तयारीत आहेत. सध्या चार हजार बेड शिल्लक असून, गरज लागल्यास राखीवदेखील आहेत. त्यामुळे सध्या जम्बो सुविधा उभारण्याची काही गरज वाटत नाही,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.