मुंबईत या मोसमातला स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. गोवंडी येथील एका २६ वर्षीय तरुणीला तिचे प्राण स्वाईन फ्लूमुळे गमवावे लागले आहेत. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात या तरुणीचा मृत्यू झाला. दनिश्ता खान असं या तरुणीचं नाव आहे, तिला ८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १३ जुलैच्या रात्री म्हणजेच शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दनिश्ता खान या तरुणीला लेप्टोचीही लागण झाली होती असेही रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार समजते आहे. तिच्यावर एमआयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान १३ जुलै रोजी रात्री तिचा मृत्यू झाला. मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाचेही रुग्ण वाढले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या २३७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ज्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. जानेवारी ते जुलै या कालावधीत राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण रूग्णांची संख्या १४ लाख २४ हजार ३५० इतकी आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. तसेच राज्यात जानेवारीपासून १९१ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला अशीही माहिती दिली.