मुंबईतील करोनाचा रुग्ण दुपटीचा कालावधी ८० दिवसांवर पोहोचला असून बाधित व्यक्ती आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मंगळवारी ७०९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गेल्या दोन अडीच महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा इतक्या कमी संख्येने  रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. मात्र ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर मात्र ५.५ टक्के आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा कालावधी एक टक्कय़ांपेक्षाही खाली आला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८७ टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज हजाराच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होते आहे. १२ मे रोजी एका दिवसात ४२६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर दररोज रुग्णांची संख्या वाढतच होती. गेल्या आठवडय़ात २८ जुलैला ७१७ रुग्णांची नोंद झाली आणि त्यानंतर मंगळवारी ४ ऑगस्टला ७०९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाचा आलेख उतरणीला लागला आहे.

मंगळवारी ७०९ नवीन रुग्ण आढळल्यामुळे  एकूण बाधितांची संख्या १ लाख १८ हजार १३० झाली आहे. तर एका दिवसात जेवढे नवीन रुग्ण आढळले त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मंगळवारी ८७३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ९०,९६२ म्हणजेच ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २०,३२६ रुग्ण  उपचार घेत आहेत.

मृत्यूदर ही मात्र मुंबईसाठी चिंतेची बाब असून मंगळवारी ५६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात ३९ पुरुष व १७ महिला होत्या. मृतांचा एकूण आकडा ६५४६ वर गेला असून मृत्यूदर ५.५ टक्के कायम आहे.

चाचण्यांचे सहा महिने

मुंबईतील करोनाची पहिली चाचणी ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. ३ ऑगस्टला चाचण्यांनी सहा महिने पूर्ण केले असून या कालावधीत पाच लाख ५९ हजार ७८७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.

* १२ मे रोजी एका दिवसात ४२६ रुग्ण

* २८ जुलैला एका दिवसात ७१७ रुग्ण

* ४ ऑगस्टला एका दिवसात ७०९ रुग्ण