चहा-बुर्जीच्या गाडय़ा, हौशी सायकलस्वारांची गजबज

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाणारे रेस्तराँ, पब, मॉल-बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उडालेली झुंबड हे ‘मुंबई २४ तास’बाबत रंगविलेले चित्र प्रत्यक्षात येण्यास अवकाश असला तरी रात्रीच्या वेळी चहा-बनमस्का, बुर्जी-पावच्या गाडय़ांभोवती रंगणारे गप्पांचे फड, हौशी सायकलस्वारांची भटकंती हे मुंबईचे रसरशीत ‘रात्रजीवन’ मात्र अव्याहत सुरू आहे. यात आता भर पडली आहे ती अ‍ॅपवर चालणाऱ्या खवय्येगिरीची.

अवेळी उतरलेले पर्यटक किंवा कामानिमित्त आलेल्या नवख्या व्यक्तींना पहाटेपर्यंत जेवण उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलची दक्षिण मुंबईत कमतरता नाही. या भागात चहा-कॉफी, बनमस्कापासून सीख-पराठा, शिरा पराठा, देशी-विदेशी शाकाहारी-मांसाहारी पदार्थ पहाटेपर्यंत सहज उपलब्ध होतात. शालिमार, दिल्ली दरबार, जाफर भाई, दावत इन, झमझम, कॅफे झीनत आणि अशी बरीचशी प्रसिद्ध हॉटेल पहाटेपर्यंत सुरू आहेत. बहुतांश हॉटेलचालक मुदतीनंतर म्हणजे मध्यरात्री एक-दीडनंतर ग्राहकांना खुष्कीच्या मार्गाने आत घेतात, तर काही ठिकाणी निडरपणे ग्राहकांचे स्वागत करून त्यांना हवे ते अन्नपदार्थ वाढतात. स्वीगी, झोमॅटो आणि अन्य अ‍ॅपआधारित सेवा वापरून अन्नपदार्थ मागवणाऱ्यांसाठी अनेक हॉटेलचे भटारखाने पहाटेपर्यंत धगधगतात. हॉटेलांव्यतिरिक्त डोंगरी, पायधुनीत अनेक ठिकाणी सीख-पराठय़ांचा भाजका सुगंधही पहाटेपर्यंत असतो. भेळीपासून शिरा-पराठा किंवा अन्य अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांचीही रेलचेल आढळते. मदनपुरा तर या हातगाडय़ांमुळे खाऊगल्लीचे रूप धारण करतो.

गरमागरम चहा-कॉफीचा आस्वाद घेत निवांत गप्पागोष्टी करण्यासाठी दोन टाकी (नागोरी) आणि डंकन रोड (कृष्णा) हे हक्काचे अड्डे आहेत. इथली पहाटेपर्यंतची गजबज कमी झालेली नाही. चहा-कॉफीच्या निमित्ताने अनेक घोळके येथे जमतात आणि पहाटेपर्यंत रेंगाळतात. दोन टाकी चौकात रात्री दोननंतर गर्दी वाढते. डंकन रोडवरील कृष्णा नावाच्या दुकानात चहा-कॉफीसह वडापाव आणि अन्य पदार्थ उपलब्ध होतात. प्रसंग कोणताही असो, ही दोन ठिकाणे मात्र कायम सुरू असतात, असे सांगितले जाते. पहाटे गप्पा मारणाऱ्यांचे गट पांगले की हातावर पोट असलेल्या श्रमिकांची गर्दी याच अड्डय़ांवर चहा घेत ताजीतवानी होते आणि पुढे आपापल्या कामासाठी निघून जाते. पान, तंबाखू, सिगारेटची शोधाशोध करावी लागत नाही. ‘मेसेज’ केला तरी ठरावीक मिश्रणाचे पान, मावा तयार ठेवणाऱ्या ‘गाद्या’ २४ तास सुरू राहतात. या भागांप्रमाणेच शीव कोळीवाडा किंवा अ‍ॅन्टॉप हिलमधील मांसाहारी पदार्थ, कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ढाबे-दुकानांचा पर्यायही उपलब्ध आहे. येथील बहुतांश ढाबे पहाटेपर्यंत खवय्या ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवतात.

मध्य मुंबईत दादर तर पूर्व उपनगरांत मुलुंड येथे पहाटेपर्यंत तळीरामांची तहान भागवण्याची व्यवस्था आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळील बार पहाटेपर्यंत सुरू असतो. येथे लोकल चुकलेल्यांपेक्षा किंवा परराज्यांमधून अवेळी उतरलेल्या प्रवाशांपेक्षा मध्यरात्री शहरातील सर्व बार बंद झाल्यानंतर मद्याची तल्लफ न भागलेल्यांची जास्त गर्दी असते. ही गर्दी पहाटे लोकल सेवा सुरू झाल्यावर पांगते. सर्वप्रकारचे अन्नपदार्थ आणि मद्य पार्सल घेऊन जाणाऱ्यांचीही तितकीच गर्दी या बारबाहेर आढळते. मुलुंड चेकनाक्याजवळील बारमध्येही हेच चित्र असते.

संपूर्ण शहरात सायकलवरून चहा-कॉफी विकणाऱ्या फेरीवाल्यांचे जाळे आहे. अपरात्री प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, वाहनचालकांना सायकलवर मिळणारा गरमागरम चहा आधार देतो. चहासोबत ठिकठिकाणी वडापाव, ऑम्लेट पाव, बुर्जी-पाव, इडली-वडा, डोसा उपलब्ध होणारी नेमकी ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर खाण्याच्या निमित्ताने घोळके जमतात.

हौशी सायकलस्वारांनाही रात्रीची मुंबई खुणावते. या वेळी मोकळ्या रस्त्यांवर मुक्तपणे दोन चाके दामवटता येतात. मुंबईचा कोपरान्कोपरा सायकलवरून पिंजून काढण्याच्या मोहिमा रात्री निघतात त्या त्याचमुळे. मोहिमा फत्ते झाल्यानंतर चहापान, पोटपूजेची हक्काची ठिकाणेही उपलब्ध असल्याने या एका वेगळ्या पर्यटनालाही पसंती मिळते आहे.