News Flash

मार खाल्ला तर पदावरून काढेन!

राज ठाकरे यांनी ‘यापुढे मार खाल्ला तर पदावरून काढून टाकीन’ असा सज्जड दम पदाधिकाऱ्यांना सोमवारी दिला.

राज ठाकरे

राज यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

फेरीवाले विरुद्ध मनसे वादात सुरुवातीला मार खाणारे फेरीवाले आता आक्रमक होऊ लागले असून मालाडपाठोपाठ काल विक्रोळीतही फेरीवाल्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यात मनसेचे पाच पदाधिकारी गंभीर जखमी झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राज ठाकरे यांनी ‘यापुढे मार खाल्ला तर पदावरून काढून टाकीन’ असा सज्जड दम पदाधिकाऱ्यांना सोमवारी दिला.

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात एल्गार पुकारला. या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी रेल्वे व पोलिसांना पंधरा दिवसांची मुदतही दिली. त्यानंतर सोळाव्या दिवशी ठाण्यासह मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून पिटाळून लावले होते. या घटनेनंतर फेरीवाल्यांच्या बाजूने उभे राहात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच यापुढे फेरीवाले मार खाणार नाहीत, अशी भूमिका घेतली. त्यानंतर मालाड येथे मनसेच्या विभाग अध्यक्ष माळवदे याला फेरीवाल्यांनी मारहाण केली. काल विक्रोळी टागोरनगर येथे मनसेचे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम व काही कार्यकर्ते फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत असतानाच अब्दुल अन्सारी व अन्य काही जणांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारले. या मारहाणीची माहिती मिळताच मनसेचे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे व उपविभाग अध्यक्ष उपेंद्र शेवाळे व कार्यकर्ते हे रात्री अब्दुल अन्सारी याला मारण्यासाठी गेले असताना अब्दुल व त्याच्या सहकाऱ्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या पाच कार्यकर्त्यांना फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनसे आता फेरीवाल्यांकडून मार खाऊ लागल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राज ठाक रे यांनी आज कृ ष्णकुंज येथे मनसेच्या विभाग अध्यक्षांची तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘कोणतीही तयारी न करता तुम्ही जाताच कसे’ असा सवाल करत यापुढे मार खाणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावरून तात्काळ काढले जाईल, असा सज्जड दम राज यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या काही दिवसांत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक होण्याचा आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, पोटासाठी व्यवसाय करणाऱ्यांना दादागिरी करून हुसकावून लावणाऱ्या मनसेच्या गुंडांना फेरीवाल्यांनी चांगलेच चोपले असून आता तरी मनसेची गुंडागर्दी थांबेल, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 2:26 am

Web Title: mumbai hawkers beat mns worker raj thackeray
Next Stories
1 माधव भांडारी आता ‘संभाव्य’ यादीत!
2 भाजपचे लाड २१० कोटींचे मालक
3 वातानुकूलित लोकल २५ डिसेंबरपासून सेवेत?
Just Now!
X