मुंबईत बोकाळलेल्या फेरीवाल्यांना ‘अभय’ कुणाचे आणि कारवाई कोणी करायची, यावरून ‘राज’कारण तापले असतानाच, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपची थंड भूमिकाच फेरीवाल्यांच्या पथ्याशी पडत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेली २० वर्षे पालिकेत सत्तेवर असलेल्या युतीने दुर्लक्ष केल्यामुळेच अनधिकृत फेरीवाल्यांची महापालिका मुख्यालयासमोर दंड थोपटून उभे राहण्याची हिंमत झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या ज्या वेळी अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे प्रयत्न केले, त्या त्या वेळी राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस व पालिका अधिकाऱ्यांना हात बांधून बसावे लागले. वसंत ढोबळे यांच्या बदलीमुळे अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची हिंमत करायची कोणासाठी असा सवाल पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांना रस्त्यावर अन्न शिजवता येत नाही तसेच पालिका शाळा, प्रार्थनास्थळे, रुग्णालये यांच्या दीडशे मीटर परिसरात व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे, हे महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांना माहिती नाही का, असा सवालही पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी केला.
 काँग्रेसचे आमदार व खासदार मतांसाठी अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांची बाजू घेत आहेत.
मात्र सेना-भाजपही थंड असल्याने फेरीवाले गुरुवारी आझाद मैदानावर मोर्चा काढू शकले, असेही पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज म्हणतात, मोर्चा नव्हताच!
विशेष प्रतिनिधी, मुंबई :  फेरीवाल्यांना दिलेल्या इशाऱ्यावर आपण अजूनही ठाम आहोत. गुरुवारी आझाद मैदानावर मोर्चा नव्हे, तर धरणे धरणार असे फेरीवाल्यांनी कळविल्याचे पोलिसांनी आपल्याला सांगितल्यामुळेच आपण शांत आहोत. दणका कधी द्यायचा याची योग्य वेळ मला माहीत आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.  सरकार, पोलीस व पालिका काही करणार नसेल तर मनसे आपली ताकद निश्चितपणे दाखवेल असे राज ठाकरे म्हणाले. आपण काय बोललो याची मला पूर्ण कल्पना आहे व वेळ आल्यानंतर मनसेचा झटका काय असतो तेही मी दाखवून देईन असेही ते म्हणाले.  
मनसेला न जुमानता मोर्चा
मुंबई : मनसेने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता मुंबईतील फेरीवाला संघटनेने गुरुवारी आझाद मैदानात मोर्चा काढला. सुमारे दोन हजार फेरीवाले या मोर्चात सहभागी झाले होते. साहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांच्या वाकोला येथील कारवाईदरम्यान एका फेरीवाल्याचा मृत्यू झाला होता. या विरोधात फेरीवाल्यांनी मोर्चा काढण्याची तयारी चालवली होती. मात्र, हिंमत असेल तर मोर्चा काढूनच दाखवा, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. तरीही, गुरुवारी ‘आझाद हॉकर्स युनियन’च्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर मोर्चा काढला. पश्चिम उपनगरांतील फेरीवाले या मोर्चाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.