उपनगरीय लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात पोलीस उपायुक्त किसन शेणगल यांची आरोपींचा साक्षीदार म्हणून सरतपासणी करण्याच्या खटल्यातील १३ आरोपींनी केलेल्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी हिरवा कंदील दाखवला.
खटला नि:पक्षपातीपणे चालविण्याच्या आणि आरोपींना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळावी या हेतूने आपण आरोपींची मागणी मान्य करीत असल्याचे न्यायमूर्ती साधना जाधव यांनी हे आदेश देताना स्पष्ट केले.
इंडियन मुजाहिदिनचे दहशतवादी आरोपी असलेल्या अन्य एका खटल्यातील आरोपींचे कबुलीजबाब शेणगल यांनी नोंदवले आहेत. या आरोपींनी २००५ नंतर घडविण्यात आलेले सर्व बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदिनने घडवून आणल्याची कबुली दिली आहे. साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील या आरोपींच्या कबुलीजबाबानुसार ७/११चे बॉम्बस्फोटही इंडियन मुजाहिदिननेच घडविले आणि त्यात आपला काहीच संबंध नाही. त्यामुळे शेणगल यांना आपले साक्षीदार म्हणून साक्ष घेऊ देण्याची विनंती केली होती. ज्यायोगे शेणगल हे आपल्या साक्षीदरम्यान इंडियन मुजाहिदिनच्या आरोपींनी कबुलीजबाबात काय सांगितले हे न्यायालयाला सांगू शकतील, असा दावा आरोपींनी याचिकेत केला होता. खटल्याचे कामकाज प्रलंबित करण्याच्या हेतूने आरोपींकडून ही युक्ती केली जात असल्याचा आरोप करून सरकारी पक्षाने आरोपींच्या याचिकेला तीव्र विरोध केला होता.