मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. कोलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी २९३.८ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

कोविड हेल्थ सेंटरमध्ये पाणी

दोन दिवसांपूर्वी मिरा-भाईंदर परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते कोविड सेंटरचं उद्धाटन करण्यात आलं होतं. मुसळधार पावसामुळे या कोविड सेंटरमध्येही पाणी शिरल्याचं दिसलं. परंतु या ठिकाणी अद्याप जास्त सामान नसल्यानं मोठं नुकासन टळलं. तर दुसरीकडे मुंबईतील जेजे रुग्णालयातही तळमजल्यात पाणी शिरलं होतं.

दक्षिण मुंबईदेखील जलमय

दक्षिण मुंबईतील ज्या ठिकाणी पाणी साचलेलं दिसत नाही अशा ठिकाणीदेखील बुधवारी झालेल्या पावसानंतर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. चर्नी रोड, गिरगाव, बाबुलनाथ परिसर, पेडर रोड आणि वाळकेश्वरसारख्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

२९० लोकांना ट्रेनमधून सुखरूप काढलं बाहेर

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेलाही बसला. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं. त्यामुळे दोन रेल्वे गाड्यांमध्ये जवळपास २९० प्रवासी अडकले होते. त्यांना एनडीआरएफ आणि आरपीएफच्या टीमनं सुरक्षित बाहेर काढलं. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली.

पालघर जिल्ह्याला झाडेपले

मुसळधार पावसाने बुधवारी पालघर जिल्ह्याला झोडपले. पालघर तालुक्यासह डहाणू, तलासरी, वसई व विक्रमगड या तालुक्यांमध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून मुसळधार पाऊस झाला. अनेक निवासी भागांत पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. वसई-विरार शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. वसई पूर्वेतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत अनेक घरांचे नुकसान झाले.

तलावांच्या पातळीत वाढ

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांमधील पावसाच्या हजेरीने पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांची चिंता काहीशी कमी झाली. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार तलावांमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३३ हजार ४११ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली. त्यामुळे तलावांतील जलसाठा पाच लाख ३९ हजार ३०७ दशलक्ष लिटरवर पोहोचला. बुधवारीही तलावक्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम होता. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोडकसागरमध्ये २८ मि.मी.,तानसामध्ये ६७ मि.मी., मध्य वैतरणामध्ये १४ मि.मी., तुळशीमध्ये ७४ मि.मी., तर विहारमध्ये ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली.