News Flash

आठवडय़ाची मुलाखत : विकास हवा, पण वारसाही जपावा!

महापालिकेच्या आगामी प्रकल्पात या संवर्धनाच्याच कामांना महत्त्व अधिक देण्यात आले आहे.

मुंबई शहराचा एकीकडे विकास करताना शहराच्या पुरातन ऐश्वर्याला तिलांजली दिली जात असल्याचे हल्ली हमखास चित्र दिसते. हे पुरातन वैभव नाहीसे झाल्यास मुंबई शहराची जुनी ओळख कायमची नामशेष होईल काय, हा प्रश्नही उभा राहिला आहे. मुंबईचा पुरातन ठेवा जपण्यासाठी व त्याचे संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगरपालिका या पुरातन ठेव्यांबाबत सजग आहे का? हे जाणून घेण्यासाठी पालिकेच्या ‘हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी’चे सदस्य व वास्तुरचनाकार राजीव मिश्रा यांच्याशी ‘लोकसत्ता’ने केलेली ही खास बातचीत..

राजीव मिश्रा – सदस्य, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी

* मुंबईचे ‘पुरावैभव’ जपण्यासाठी आपण काय प्रयत्न करता आहात?

मुंबईतील पुरातन ठेवा जपण्याची सध्या नितांत गरज निर्माण झाली आहे. हा ठेवा जपला नाही तर आपल्या पुढच्या पिढय़ांना आपण मुंबई कशी होती हे कधीच सांगू शकणार नाही. आणि असे जर झाले तर ती आपल्यासाठी दुर्दैवाची बाब ठरेल. सध्या मुंबईत महापालिका व शासनातर्फे मुंबईचे ‘पुरावैभव’ वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईचा इतिहास आणि येथील पुरातन वास्तू जपण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत काही योजना व प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘टेक्सटाइल म्युझियम’. मुंबई उभी करण्यात गिरणी कामगारांचा फार मोठा वाटा होता. मुंबईतल्या गिरण्या आणि त्यात काम करणारे हे कामगार ही शहराची ओळख होऊन बसली होती. मात्र कालांतराने हा लढा संपल्यानंतर गिरणी कामगाराने मुंबईला दिलेली ओळख ही पुसली जाऊ लागली. तसेच त्या काळात मोठा व्यापार करणाऱ्या गिरण्या आज हद्दपार होऊन तेथे टॉवर उभे राहिले आहेत. त्यामुळे गिरणी कामगारांचा एकंदर जीवनपट या ‘टेक्सटाईल म्युझियम’च्या द्वारे मुंबईत उभा करणार आहोत. यांसह जुन्या मुंबईची ओळख जपणारे असे अनेक प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत. जेणेकरून आज काही पुरातन ठेवा नष्ट झाला जरी असला तरी त्याबाबतची सगळी माहिती अशा प्रकल्पांतून नागरिकांना मिळू शकेल.

* पण मुंबईतील अनेक पुरातन वास्तू सरकारमार्फत जपल्या जातात असे चित्र दिसत नाही?

नाही. असे सरसकट बोलून चालणार नाही. अनेक जुन्या वास्तू यापूर्वी विकास करताना नष्ट झाल्या त्याचे कारण म्हणजे त्यांचे तेव्हा महत्त्व कळून आले नाही. मात्र आता तशी बाब राहीलेली नाही. सध्या मुंबईत ज्या-ज्या पुरातन वास्तू किंवा अवशेष आहेत त्यांची नोंद मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केली आहे. त्याची माहिती कमिटीच्या पालिकेतील कार्यालयात अथवा संकेतस्थळावर आपणास सापडेल. त्यांना ‘हेरीटेज प्रेसिंग्थ’ असे आम्ही संबोधतो. काळबादेवी, भुलेश्वर, कुलाबा, कोळीवाडे ही मुंबईतील जुन्या नागरी व्यवस्थेची उत्तम उदाहरणे आजही शाबूत आहेत. ती जपली जावीत यासाठी शासन व पालिका यांनी एकत्र येत धोरण ठरवण्याचे निश्चित केले आहे. यासाठी आमच्या ‘मुंबई हेरिटेज कमिटी’मार्फतही काम सुरू असून शहराच्या पुरातन ठेव्यांना जपण्यासाठी आम्ही नवे पर्याय वेळोवेळी सुचवत आहोत.

*  मुंबईत सध्या पुरातन वास्तू संवर्धनाचे काम दिसत नाही.

नाही. महापालिकेमार्फत पुरातन वास्तू संवर्धनाची कामेदेखील सुरू आहेत. नुकतेच ओपेरा हाऊसचे संवर्धन पूर्ण करण्यात आले. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाचे संवर्धन करून नियमित करण्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस, पोस्टाचे मुख्यालय आदींचेही संवर्धनाचे काम झालेले आहे. या वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी आमच्या कमिटीमार्फत तात्काळ मान्यता दिली जाते. अशी कोणतीच प्रकरणे आमच्याकडे प्रलंबितही नाहीत. या सगळ्या वास्तू जुन्या असल्याने त्यांच्यावर थेट काम करता येत नाही. त्यासाठी एक आराखडा आखून काम करावे लागते. महापालिकेच्या आगामी प्रकल्पात या संवर्धनाच्याच कामांना महत्त्व अधिक देण्यात आले आहे. इथून पुढे राज्यपालांचे निवास स्थान, डेविड ससून लायब्ररी आदींचे संवर्धन हाती घेण्यात येणार आहे.

*  मुंबईतील दगडी रस्ते व पूल पाडले पण त्यांचे जतन झाले नाही.

तेच, यापूर्वी ज्या-ज्या गोष्टी पाडल्या गेल्या किंवा नष्ट झाल्या त्यांची आवश्यकता न लक्षात आल्याने त्या जपल्या गेल्या नाहीत. मात्र अशा जुन्या रस्त्यांचे, पुलांचे विशिष्ट दगड असोत किंवा अन्य काही अवशेष असोत, आम्ही ते छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाकडे संवर्धन व संशोधनासाठी पाठवून देतो. तेथील प्रदर्शनातही त्यांची मांडणी करण्यात येते व ते मुंबईत कोठे आढळले याची माहितीही दिली जाते. कारण सध्या जे जुने पूल पाडले जात आहेत ते कमकुवत झाले आहेत. या पुलांवर खूप मोठी वाहतूक व्यवस्था अवलंबून आहे. ती अबाधित राखण्यासाठी हे पूल पाडले जात आहेत. त्यात काही विशिष्ट बाब आढळली तर तिचे नक्कीच जतन केले जाईल.

*  मुंबईचा विकास आणि शहाराचे पुरातन वैभव यात नेहमी विकासाचा पर्याय निवडला जातो. हे रोखण्यासाठी काय करणार आहात?

मुंबईचा विकास करण्यात यावा. तो रोखला जावा असे आमचेही मत नाही. मात्र विकास करताना शहराचे पूर्वीचे वैभव नष्ट होईल असा प्रयत्न करण्यात येऊ नये ही आमची इच्छा आहे. यासाठी आमच्या हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीने पालिकेला प्रस्ताव दिला आहे  की, एखाद्याच्या जागेत एखादी पुरातन वास्तू असेल आणि त्याला विकास करायचा असेल तर त्याला पालिकेने ‘हेरिटेज टीडीआर’ द्यावा. म्हणजे त्या पुरातन वास्तूच्या जागेचा जो काही एफएसआय असेल तेवढा टीडीआर त्या व्यक्तीस द्यावा जेणेकरून तो त्या टीडीआरचा वापर करू शकेल आणि ती पुरातन वास्तूही वाचू शकेल. पालिकेने असा टीडीआर देण्यास सुरुवातही केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:31 am

Web Title: mumbai heritage conservation committee member rajiv mishra interview for loksatta
Next Stories
1 तपासचक्र : केवळ खबऱ्यामुळेच!
2 जाणा तुमची शहर टॅक्सी योजना!
3 बँकांचे ‘सव्‍‌र्हर’ थकले, नागरिकांचा राग अनावर
Just Now!
X