न्यायालयाचा ‘मार्ड’ला सवाल; ‘मेस्मा’ बाबतही निर्णय होणार

मागण्या मान्य करून घेण्यासाठी डॉक्टरांनी संपावर जाऊन सर्वसामान्य रुग्णांना वेठीस धरण्याची कृती किती योग्य आणि डॉक्टर मुळात संपावरच कसे जाऊ शकतात? असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने मंगळवारी ‘मार्ड’ला करून धारेवर धरले. एवढेच नव्हे, तर अशा आंदोलने करणाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागू करायचा की नाही याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

डॉक्टरांच्या आंदोलनाविरोधात अफाक मांदवीय यांनी अ‍ॅड्. दत्ता माने यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळेस आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना ‘मेस्मा’ लागू शकत नाही, असे वक्तव्य ‘मार्ड’तर्फे वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत करण्यात आल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये ‘मेस्मा’ लागू केला जावाकी नाही याचा निर्णयही न्यायालयाने घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. ती मागणी न्यायालयाने मान्य केली. शिवाय वकिलांनी केलेल्या संपानंतर संपकरी वकिलांना फौजदारी अवमान नोटीस बजावण्यासोबत भविष्यात असे आंदोलन केले जाणार नाही, असे हमीपत्रही घेण्यात आल्याची आठवण न्यायालयाने केली. त्यामुळे डॉक्टर संपावर जाऊच कसे शकतात आणि ‘मार्ड’ आपल्या कृतीचे समर्थन कसे करणार? असा सवाल न्यायालयाने केला.

शिवाय भविष्यात असे आंदोलन करणार नाही, असे हमीपत्र देणार का, अशी विचारणाही न्यायालयाने ‘मार्ड’कडे केली.

दुसरीकडे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी समितीच्या पुनस्र्थापनेला आपला आक्षेप नाही. मात्र ही समिती चौकशी समिती नसावी, असे सांगत आपली बाजू मांडली. त्यावर डॉक्टरांची गाऱ्हाणी ऐकणारी तक्रार निवारण समिती ही डॉक्टरांच्या सगळ्यात अगदी अधिष्ठात्यांविरोधातील तक्रारीही ऐकेल.

मात्र ही समिती चौकशी समिती नाही, असे राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. तर माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती डी. के. देशमुख यांनी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास नकार दर्शवल्याने तक्रार निवारण समितीच्या पुनस्र्थापनेचा निर्णय १८ एप्रिलपर्यंत लांबणीवर पडला आहे. त्यामुळे सोमवापर्यंत नवी नावे सुचवण्याची सूचना न्यायालयाने हंगामी महाधिवक्त्यांवर सोपवली आहे. सुरुवातीला ‘मार्ड’तर्फे त्याला आक्षेप नोंदवण्यात आला.