तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश

आपल्या मागण्यांसाठी संप पुकारून, निषेधाच्या वा सामूहिक सुट्टीच्या नावाखाली कामापासून दूर राहून रुग्णांना वेठीस धरणार नाही, अशी हमी देऊनही डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनांच्या निषेधार्थ काम बंद करणाऱ्या निवासी डॉक्टरांविरोधात उच्च न्यायालयात सोमवारी अवमान याचिका करण्यात आली. तसेच या डॉक्टरांना तातडीने कामावर रूजू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

धुळे, नाशिक आणि शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे राज्यभरातील सरकारी-निमसरकारी रुग्णालयातील रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. हे आंदोलन पुकारून त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. त्यामुळे या डॉक्टरांना तातडीने कामावर रूजू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अफाक मांदवीय यांनी अवमान याचिकेत केली आहे.

डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटनांविरोधात या पूर्वीही ‘मार्ड’ या मुख्य संघटनेसह अनेक संघटनांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी यापुढे संप पुकारून, निषेधाच्या वा सामूहिक सुट्टीच्या नावाखाली कामापासून दूर राहून रुग्णांना वेठीस धरणार नाही, असे हमीपत्र देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे हमीपत्र देण्यातही आले होते. तर सरकारी-निमसरकारी रूग्णालयांतील डॉक्टरांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत सरकारने त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे न्यायालयाने सरकाराल बजावले होते.