मेट्रोच्या कारशेडसाठी आरे परिसरातील झाडांच्या कत्तली करण्यास मुंबई हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या मुद्द्यावर मोठ्या प्रामाणावर विरोध होत असल्याने कोर्टाचा पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतेही झाड तोडू नये, असे कोर्टाने तोंडी बजावले आहे. याबाबत ३० सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

त्याचबरोबर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटले की, “आम्ही वैयक्तिकरित्या आरेचा दौरा करणार आहोत. या दौऱ्यात नक्की विरोधाचा मुद्दा काय आहे हे पाहणार आहोत. कारण, काही वेळेला पर्यावरण विषयक गंभीर प्रकरणात वैयक्तिकरित्या सत्यता पडताळणे गरजेचे असते.

आरे मेट्रो-कारशेडप्रकरणी हायकोर्टात एकूण ११३ याचिका दाखल झाल्या असून यावर आज एकत्रित सुनावणी झाली. आरेमधील २१८५ झाडे तोडण्यासाठी आणि ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयाला पर्यावरण प्रेमी जोरु बथेना यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मेट्रोचं कारशेड आरेमध्ये झालं नाही तर कुठेच होणार नाही, यासाठी हीच योग्य जागा असल्याचे पालिकेसह मेट्रो प्राधिकरणाच्या अध्यक्षा अश्विनी भिडे यांचे म्हणणे आहे. मात्र, या कारशेडला आता शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांसह अनेक सामान्य नागरिक आणि सेलिब्रेटिंनीही विरोध दर्शवला आहे. यासाठी विविध ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली आहेत.