हुंड्याच्या गुन्ह्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ हिला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला. दर बुधवारी ११ ते १ या वेळेत कांदिवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. दरम्यान, राधे माँ आज चौकशीसाठी कांदिवली पोलीसांपुढे हजर झाली. सुमारे तीन तास तिची कसून चौकशी करण्यात आली. राधे माँ दुपारी बाराच्या सुमारास कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल झाली. कांदिवली आणि बोरिवली पोलीसांकडून तिची चौकशी करण्यात आली. मुंबई पोलीसांनी राधे माँला आधीच समन्स बजावले होते आणि तिला कांदिवली पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले होते.
सासरच्या कुटुंबियांकडून आपला शारिरीक आणि मानसिक छळ होत असून, त्याला अध्यात्मिक गुरू सुखविंदर कौर उर्फ राधे माँ जबाबदार असल्याचा आरोप निक्की गुप्ता या विवाहितेने केला होता. निक्की हिने दिलेल्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी राधे माँसह सात जणांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.