कमला मिल कंपाऊंड आगीचा तपास करणाऱ्या समितीला १० सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. लोअर परळमधील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयाने तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली होती.

न्यायालयाने गठीत केलेल्या समितीचं नेतृत्व निवृत्त चीफ जस्टीस ए व्ही सावंत यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. याशिवाय वसंत ठाकूर आणि माजी मुख्य सचिव एन नलीनक्षण यांचा समितीत समावेश करण्यात आला होता. याआधी समितीला ३१ ऑगस्ट रोजी अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता.

महापालिकेने न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली. ‘समितीने आपली प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व डेटा एकत्र करण्यात आला असून अहवाल तयार केला जात आहे. समितीने अहवाल सादर करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत वेळ मागितला आहे’, असं महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात सांगितलं.

न्यायालयाने विनंती मान्य करत समितीला १० सप्टेंबरला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.