‘शक्ती मिल’मधील सामूहिक बलात्कारांच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा परिसर तारांचे कुंपण आणि सुरक्षारक्षकांनी सुरक्षित करण्याचे आदेश गुरुवारी दिले.
मिलच्या परिसरात पुन्हा सुरक्षारक्षक तैनात करण्यासोबत तारांचे कुंपण बांधण्याचे, उजेडासाठी हॅलोजन लाईट्स बसविण्याचे तसेच मिल आणि त्यालाच जोडून असलेल्या रेल्वेच्या मालमत्तेमध्ये एक भिंत उभारण्याचे आदेश न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी अधिकृत अवसायकाला दिले.
मिलच्या परिस्थितीबाबत बांधकाम अभियंत्याने दिलेला अहवाल साहाय्यक अधिकृत लिक्विडेटर रूपा सुतार यांनी न्यायालयात सादर केला. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले.
मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ही पावले उचलताना वा उपाययोजना करताना बलात्कार झालेली ‘ती’ जागा सुरक्षित राहील याची काळजी घेण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून पुराव्यांच्या दृष्टीने ही जागा सुरक्षित राहणे गरजेचे असल्याचेही म्हटले.
मिलच्या परिसरातील जर्जर झालेल्या भिंती पूर्णपणे वा अंशत: पाडण्याचे स्पष्ट करताना तेथे तसेच जेथे अजिबात भिंती नाहीत तेथे तारांचे कुंपण उभारण्याचे न्यायालयाने आदेश दिले. शिवाय रात्रीच्या वेळेस आवश्यक प्रकाश देतील एवढी हॅलोजन लाईट्स बसविण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. मिलच्या आतील परिसर लगतच्या रस्त्यावरून दृष्टिपथात येईल या हेतूने हे करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कायदेशीर लढय़ामुळे १९८१पासून मिलच्या जागेचा ताबा अधिकृत अवसायकाच्या अखत्यारीत आहे. पालिकेने गेल्या जूनमध्ये अधिकृत अवसायकास पत्रव्यवहार करून ओसाड, धोकादायक आणि निर्जन अवस्थेत असलेल्या मिलबाबत कळविले होते. त्यानंतर अवसायकाने याबाबत न्यायालयाला कळविल्यानंतर न्यायालयाने मिलच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बांधकाम अभियंत्याची नियुक्ती करीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आला.
 या अहवालात मिलचे बांधकाम धोकादायक स्थितीत असल्याचे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलली जाण्याचे म्हटले होते.