मुंबईतील मेट्रो ३ च्या मार्गातील अडथळा दूर झाला असून बीकेसी आणि धारावी स्थानकाच्या बांधकामास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. बीकेसीतील १०८ खारफुटी तोडण्यास हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला.

वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रस्तावित मेट्रोच्या स्थानकासाठी १०८ खारफुटी तोडण्याकरिता परवानगी द्यावी, या मागणीसाठी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेडने (एमएमआरसीएल) याचिका केली होती. मात्र या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध दर्शवण्यात आला होता. विविध सामाजिक संघटनांनी याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने १०८ तिवराची झाडे तोडण्यास परवानगी देत बीकेसी आणि धारावी स्थानकाच्या बांधकामास हिरवा कंदील दाखवला. हायकोर्टाच्या निर्णयामुळे आता मेट्रो ३ च्या कामातील अडथळा दूर झाला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना सुनावले होते. मेट्रो-३ प्रकल्पासाठी मुंबईतील हिरवळीचा बळी दिला जात असल्याचा कांगावा करणे सोडा आणि व्यावहारिक दृष्टीकोनातून या प्रकल्पाकडे पाहा, असे हायकोर्टाने म्हटले होते. हा प्रकल्प ३० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता. मात्र तो आता होत आहे, असेही न्यायालयाने सुनावले होते. मुंबईतील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत असून आताच त्यावर तोडगा काढण्यात आला नाही, तर पुढे ती आणखीन बिकट होईल. ही परिस्थिती लक्षात घेता मुंबईसाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे, असे हायकोर्टाने नमूद केले होते.