गोष्ट तशी साधीच आहे. १८४ वर्षांपूर्वीची. १८३३ सालातली. त्या वर्षी वाळुकेश्वरी तुंबडीबाबा नावाचा बैरागी आला होता त्याची.

मोठा अवलिया होता तो. जटाधारी, कौपीनधारी. हातात तुंबा. सोबत पाच-दहा शिष्यमंडळी. डौल मोठा सिद्धाचा. मुंबईतील शास्त्री, पंडित, वैदिक, तसेच इतर ब्राह्मण, त्यांच्या स्त्रिया, एवढेच नव्हे तर दुसऱ्या जातींच्या भिकाऱ्यांनाही त्याने धोतरजोडय़ा, पागोटी, शेले, लुगडी अशी उंची किमतीची वस्त्रे वाटून दिली. पहिल्या दिवशी त्याने असे हजार सनंग वाटले. त्यामुळे ‘ज्या ब्राह्मणाच्या अंगावर धड फाटका पंचा दृष्टीस पडत नव्हता, तो एकदा वालुकेश्वरी जाऊन आला म्हणजे नवराच बनून येई! हे पाहून कित्येकांस सुदाम देवाच्या गोष्टीचे स्मरण होऊ  लागले. मग काय विचारता, मुंबईचे लोक!’ दुसऱ्या दिवसापासून वालुकेश्वरी जत्राच जमू लागली. कोणी बाबास वारा घालीत, कोणी त्याची लंगोटी धुत, कोणी जटा नीट करत.

हे ऐकून मुंबईतला कापडबाजारही तेथे लोटला. वाणी, भाटय़े, शिंपी उंच उंच कापडाचे दिंड घेऊन तेथे जमू लागले. आपला माल खपावा म्हणून तुंबडीबाबांच्या शिष्यांची आर्जवे करू लागले. याप्रमाणे तुंबडीबाबांनी पाच-सहा दिवसांत १०-१५ हजारांच्या सनंगांचा फडशा उडवला. ज्या व्यापाऱ्यांकडून माल घेतला होता, त्यांना त्याने पैसेही दिले. हे पैसे कुठून येत? तर त्याच्या तुंबडीतून! सिद्धच तो. तुंबडीतून द्रव्य उत्पन्न करी. ते पाहून मुंबईतील शेट सावकारही तुंबडीबाबांच्या पायाशी येऊ  लागले.

आणि एके दिवशी काय झाले?

आपले ‘मुंबईचे वर्णन’कार गोविंद नारायण माडगांवकर यांच्याच शब्दांत सांगायचे, तर- ‘शेवटीं बाबाने आपला कावा साधिला. आठ-पंधरा दिवस मुंबईत याप्रमाणें धामधूम करून सावकार लोकांकडून दहा-वीस हजार रुपयांचा (ही रक्कम १८३३ सालातली आहे!) माल लुटून शिष्यांसह वर्तमान रात्रीचा पळून गेला. सावकारांच्या हातीं तुंबडीदेखील लागली नाही.’

हे सांगून झाल्यावर माडगांवकर यांनी केलेली टिप्पणी मोठी मार्मिक आहे. ते म्हणतात, ‘या प्रतीचे ढोंगी लोक या शहरात येऊन भोळ्या लोकांस धत्तुरा दाखवून चालते होतात, तरी लोकांचें खूळ जाऊन हुशार होत नाहीत.’

म्हणजे पाहा, गेली १८४ वर्षे मुंबईकरांची या बाबतीतील हुशारी काही वाढलेली नाही. येथे सतत कोणी ना कोणी तुंबडीबाबा येतच असतात. लोकांस धत्तुरा दाखवून जातच असतात. फरक एवढाच, की पूर्वीचे तुंबडीबाबा कधीही उगवत. ते जटाधारी, कौपीन वस्त्र वगैरे ल्यायलेले असत. आज तसे काही राहिलेले नाही.

आजचे तुंबडीबाबा पांढरा सदरा, पांढरी पँट, एखादे जाकिट अशा वेशातही असतात. त्यांच्या बोटांत अंगठय़ा असतात. सोबत शिष्यपरिवार नसतो. अनुयायी असतात. काही लोक त्यांना कार्यकर्तेही म्हणतात. दर पाच वर्षांनी एके दिवशी अचानक, ते ‘फ्लेक्स’वरून अवतरतात. लोकांना आपल्या तुंबडीतून आश्वासने काढून देतात आणि तुंबडय़ा मात्र स्वत:च्या भरतात.

आणि लोक? ते मात्र ‘खूळ जाऊन हुशार होत नाहीत!’