मुंबईत करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालयं फाईव्ह स्टार हॉटेल्सचा वापर करणार आहेत. आजपासून दोन हॉटेल्स खासगी रुग्णालयाचा भाग म्हणून काम सुरु करणार आहेत.

जास्तीत जास्त रुग्णांना उपचार देण्यासाठी खासगी रुग्णालयं फोर किंवा फाईव्ह स्टार हॉटेल्ससोबत हातमिळवणी करणार आहेत. यामुळे ज्यांची प्रकृती गंभीर नाही त्यांना खासगी रुग्णालयातून हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. मात्र ही प्रक्रिया करण्याआधी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संमती आवश्यक असणार आहे.

हॉटेल्स खासगी रुग्णालयांचा विस्तारित भाग म्हणून कार्यरत असतील. हॉटेल्सना करोना रुग्णांसाठी २० रुमची गरज असून याशिवाय २४ तास डॉक्टर, नर्स, औषधं आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल. या सुविधेसाठी रुग्णालय चार हजारांपर्यंतचं शुल्क आकारु शकतात. जर रुग्णासोबत कोणी राहत असेल तर हे शुल्क सहा हजारांपर्यंत असेल.

करोनाची लक्षणं नसणारेही या सुविधेचा वापर करु शकतात. ज्यांना खरंच बेडची गरज आहे त्यांना ते उपलब्ध व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असून अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यादरम्यान पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “खासगी रुग्णालयांमध्ये तात्काळ वैद्यकीय उपचाराची गरज नसणारे रुग्णही बेड अडवून ठेवत असल्याचं समोर आलं आहे. अशा रुग्णांसाठी वेगळ्या सुविधांवर प्रभावी आणि पुरेसे व्यवस्थापन केले जाऊ शकते”.

पालिका रुग्णालयांत ‘अतिदक्षता’ संकट
करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. पालिकेच्या डॅशबोर्डनुसार मंगळवारी दुपारी अतिदक्षता विभागात ४५ तर जीवरक्षक प्रणाली सज्ज (व्हेंटिलेटर) केवळ १२ खाटा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण असून खाटा मिळवताना रुग्णांची खूप परवड होत आहे.

परिस्थिती काय?
– मुंबईमध्ये समर्पित करोना काळजी केंद्रे, जम्बो केंद्रे, करोना काळजी केंद्रे-२ आदी ठिकाणी २५ हजार ६७६ आणि १९ हजार ५३४ अशा ४५ हजार २१० खाटा उपलब्ध आहेत. यापैकी अनुक्रमे २० हजार ६८८ आणि १५ हजार ७४४ अशा एकूण ३६ हजार ४३२ खाटांवर रुग्ण असून उर्वरित अनुक्रमे ४,९८८ व ३,७९० अशा एकूण ८,७७८ खाटा रिक्त आहेत.
– पालिकेने विविध रुग्णालये, जम्बो केंद्रांतील अतिदक्षता विभागांमध्ये २,५९८ खाटा उपलब्ध केल्या असून त्यापैकी २५५३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत.
– आजघडीला अतिदक्षता विभागातील केवळ ४५ खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या सुमारे १,३०६ खाटांपैकी १,२९४ खाटांवर रुग्ण उपचार घेत असून केवळ १२ खाटा रिक्त आहेत.
– प्राणवायूची सुविधा असलेल्या १०,०५१ खाटांची सोय करण्यात आली असून यापैकी ८,६५४ खाटांवर रुग्ण आहेत. तर केवळ १,३९७ खाटा रिक्त आहेत.