‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (आयआयटी) तीन विद्यार्थ्यांना इटलीमधील सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अपमानास्पदपणे वागविण्यात आल्याने भारतातील आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

हे तीन विद्यार्थी संगणक विज्ञान शाखेला दुसऱ्या वर्षांत शिकतात. यापैकी एक मुंबई-आयआयटीचा तर दोन दिल्ली-आयआयटीचे आहेत. हे विद्यार्थी सोमवारी इटलीतील व्हेंटिसिग्लिआ या रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी त्यांना इतर परदेशी नागरिकांच्या बरोबरीने सुरक्षा अधिकाऱ्यांनी हटकले. त्यांच्याकडे पारपत्राची विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रे या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांना इतर काही परदेशी नागरिकांसमवेत रेल्वे स्थानकापासून दूर १,१०० किलोमीटर अंतरावर बारी येथे नेण्यात नेले. या विद्यार्थ्यांची ओळख पटूनही त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. देशभरातून विद्यार्थी या घटनेचा निषेध करीत आहेत. मे महिन्यात उदय कुसुपती, अक्शित गोयल आणि दीपक भट हे विद्यार्थी इटलीतील इन्रिया सोफिया अ‍ॅण्टीपोलीस या ठिकाणी इंटर्नशिप करण्याकरिता म्हणून गेले होते. शनिवारी-रविवारी जेनोवा येथे ते सुट्टीकरिता म्हणून गेले होते. त्या वेळेस त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागले.