मुंबईत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मालाड मालवणीमध्ये इमारतीचा भाग कोसळून नुकतीच एक दुर्घटना झाली आहे. आता दहिसरमधील शिवाजीनगर येथे चाळीतील तीन घरं कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे. दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा भागात असलेल्या लोखंडी चाळीत ही दुर्घटना घडली. घरं पडल्याने एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड झाला. आजूबाजूचे लोक तात्काळ घटनास्थळी धावत आले आणि मदतकार्य सुरु केलं. त्यानंतर या घटनेची माहिती दहिसर पोलिसांना देण्यात आली. या दुर्घटनेत प्रद्युम्न सरोज या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान बुधवारी मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

आमच्याकडे मृतदेह सोडण्यासाठी तशी नदी नाही; मुंबईच्या महापौरांची योगींवर टीका

मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली.