मुंबईतील सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी आणि पुणे जिल्ह्य़ात अंबी-तळेगाव येथील डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी या खासगी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

मुंबईतील सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस २०१९-२० या शैक्षणिक वर्षांपासून मान्यता देण्यात आली. आगामी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली.

या विद्यापीठाचे सोमय्या विद्याविहार, के. जे. सोमय्या ट्रस्ट व दि सोमय्या ट्रस्ट हे संयुक्त प्रायोजक मंडळ राहणार असून या विद्यापीठात विविध विद्याशाखा तसेच आंतरशाखीय अध्यापन, सक्षमता, कौशल्य विकास आणि संशोधन व विकास यांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्य़ातीला अंबी-तळेगाव येथील डी.वाय. पाटील युनिव्‍‌र्हसिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेसही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या विद्यापीठाची स्थापना करण्यासंदर्भात विधेयकाच्या मसुद्यासही मंजुरी देण्यात आली. हे विद्यापीठ शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू करण्यात येणार आहे.

 ग्रंथपाल निवृत्तीचे वय ६० वर्षे

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या सर्व शासन व शासन अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि रसायन तंत्रज्ञान संस्थेतील ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीचे वय १ जानेवारी २००६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ५८ वरून ६० वर्षे करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.