|| रेश्मा शिवडेकर

विज्ञान शाखेलाही सुगीचे दिवस – कला शाखा ‘जैसे थे’च

भारतातील बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबादसारखी शहरे ‘आयटी हब’, ‘डायमंड हब’ म्हणून उदयास आली असली तरी राज्याचेच नव्हे तर देशाचे ‘वाणिज्य’ आणि सेवा क्षेत्राचे केंद्र असलेल्या मुंबईची जुनी ओळख कायम असल्याने मुंबई विद्यापीठात अजूनही वाणिज्य शाखेची मक्तेदारी आहे. गेल्या नऊ  वर्षांत या शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थाची संख्या तब्बल ३७ हजारांनी वाढली आहे. हा टक्का २०१७-१८मध्ये विद्यापीठात प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थाच्या ५५ इतका आहे. महत्त्वाचे म्हणजे अभियांत्रिकीकडे कमी झालेला विद्यार्थाचा कल आणि विज्ञान शाखेत माहिती-तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, जैव तंत्रज्ञान आदी उपयोजित अभ्यासक्रमांची झालेली उपलब्धता यामुळे मुंबईत वाणिज्य शाखेखालोखाल ही पारंपरिक शाखाही भाव खाऊ  लागली आहे. इतकी की आतापर्यंत विद्यार्थीसंख्येत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कला शाखेचे स्थान पटकावत विज्ञान शाखेने तिला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे.

मुंबई देशाचे वाणिज्य केंद्र असल्याने विद्यापीठ व्यवस्थेत वाणिज्य ही अभ्यासशाखा अस्तित्वात आल्यापासून तिला प्रतिसाद मिळतो आहे. बारावीनंतर वाणिज्य शाखेत वित्त, विमा, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी,  परदेशी व्यापार, स्टॉक ब्रोकिंग अ‍ॅण्ड इव्हेन्स्टमेंट अ‍ॅनॅलिस्ट यांसारखे अभ्यासक्रम करता येतात. त्याला गेल्या काही वर्षांत अकाउंटन्सी अ‍ॅण्ड फायनान्स, बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, फायनान्शियल मार्केट्स अशा अभ्यासक्रमांची जोड मिळाली आहे. पुढे बिझनेस इकॉनॉमिक्स, फायनान्स अ‍ॅण्ड कंट्रोल या विषयांतही पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येऊ  शकते. या पदवीधरांना बँकिंग, ब्रोकिंग, वाणिज्य संशोधन, विमा, वित्तीय संस्था, कॉस्ट अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटन्ट अशा काही संधी असतात. म्हणून या शाखेकडील कल वाढतो आहे.

‘कला शाखेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही परंपरागत आहे. बुद्धिमान असल्यास विज्ञान आणि त्यापेक्षा कमी असल्यास वाणिज्य आणि अभ्यासात यथातथा असल्यास कला असाच शाखा निवडीबाबत क्रम असल्याने दहावीला खूप गुण असूनही फार तुरळक विद्यार्थी कला शाखेकडे जातात. हे विद्यार्थी खूपच ध्येयवादी आणि सारासार विचाराने या शाखेकडे आलेले असतात. हा अपवाद वगळता बहुतेक विद्यार्थी गणित जमणार नाही, या विचारानेच कला शाखेकडे जाताना दिसतील,’ असे निरीक्षण कीर्ती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. व्ही. एन. मगरे यांनी नोंदविले.

याशिवाय वाणिज्यची पदवी असल्यास मुंबईसारख्या ठिकाणी काहीना काही रोजगार उपलब्ध होऊ  शकतो, असे विद्यार्थ्यांना वाटते. बाहेरच्या ठिकाणी ही शाखा ओस पडल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. अर्थात गेल्या काही वर्षांत इतर विद्यापीठांमध्येही वाणिज्य शाखेला मागणी वाढताना दिसून येत आहे.

दुसरे म्हणजे देशभरात अभियांत्रिकी शाखेची वाढ खुंटली असली तरी मुंबईत ती सातत्याने वाढताना दिसून येते. गेल्या नऊ  वर्षांत मुंबई विद्यापीठाकडे प्रथम वर्ष प्रवेशाकरिता ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितीचा अभ्यास करता तंत्रज्ञान (अभियांत्रिकी) शाखेचे प्रवेश १६ वरून २३ हजारांवर गेल्याचे दिसून येते. मुंबई विद्यापीठाच्या तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेश उकरंडे यांच्या मते मुंबईत गेल्या काही वर्षांत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या (मुंबईत ते सर्वाधिक आहे) हे त्यामागील कारण असावे. दहावीला इतके गुण मिळाल्याने अभियांत्रिकी शाखेला जाण्यासाठीचा मुलांचा आत्मविश्वस वाढतो. त्याचे चित्र प्रवेशांमध्ये उमटते, असे डॉ. उकरंडे यांना वाटते.

विज्ञान शाखेत माहिती-तंत्रज्ञान, संगणक विज्ञानसारखे उपयोजित अभ्यासक्रम वाढले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे रोजगार हमी वाढली आहे. तुलनेत काही विषय वगळता मूलभूत विज्ञानकडे अजूनही कल कमीच आहे.    – डॉ. व्ही.एन. मगरे, प्राचार्य आणि प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

कला शाखेच्या कटऑफ उडय़ा ठरावीक महाविद्यालयांपुरत्याच

मुंबईत झेवियर्स, केसी, रुईया या काही महाविद्यालयांची कला शाखेची कटऑफ ९०-९५ टक्क्यांदरम्यान बंद होत असली तरी या शाखेला आलेले वलय हे ठरावीक महाविद्यालयांपुरतेच आहे. इतरत्र अजूनही या शाखेला वाली नाही. उलट २००९-१०मध्ये सुमारे ४३ हजार विद्यार्थीसंख्येवर असलेली या शाखेची गेल्या वर्षी ४२ हजारांवर घसरगुंडी झाली आहे. त्याआधीच्या वर्षांत २०१४-१५चा अपवाद वगळता या शाखेची विद्यार्थीसंख्या ३४ ते ४० हजारांदरम्यानच राहिली आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • नऊ वर्षांत वाणिज्य शाखेचे विद्यार्थी ३७ हजारांनी वाढले.
  • विज्ञान शाखेचे ३० हजारांवरून ४५ हजारांवर. विज्ञान वाणिज्यखालोखाल सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेली शाखा
  • देशभर अभियांत्रिकीकडील ओसरलेला ओढा, उपयोजित अभ्यासक्रम शिकण्याची संधी यामुळे विज्ञान शाखेला सुगीचे दिवस
  • इतरत्र अभियांत्रिकीचे प्रवेश कमी होत असताना मुंबईत ते वाढलेले दिसून येतात. दहावी-बारावीला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी मुंबईत अधिक असल्याने इथली अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडलेली दिसत नाहीत.
  • इतर विद्यापीठांमध्येही आता मुंबईचा कित्ता. विज्ञान, कला शाखेपेक्षा वाणिज्यच्या तुकडय़ांमध्ये वाढ