दक्षिण मुंबईतील नागरिकांत घबराट

मुंबई : मुंबईमधील कब्रस्तानांमध्ये करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यास नकार दिला जात असल्याने हे सर्व मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानात येत आहेत. चिराबाजारसारख्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या वस्तीच्या एका बाजूला असलेल्या बडा कब्रस्तानात करोनामुळे मृत झालेल्या दहा जणांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आले. त्यामुळे  या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. दफनविधीदरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचा दावा पालिकेच्या सी विभाग कार्यालयाकडून करण्यात आला आहे. मात्र कब्रस्तानाखालून जलवाहिन्या गेल्यामुळे भविष्यात त्याचा त्रास होणार नाही ना अशी शंका स्थानिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्याच्या पार्थिवाचे दफन न करता दहन करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. मात्र काही मिनिटांमध्येच या आदेशांमध्ये बदल करून आसपास निर्जन भाग असलेल्या ठिकाणच्या कब्रस्तानने जबाबदारी आणि योग्य ती काळजी घेतल्यास दफनविधी करता येतील असे नवे आदेश जारी करण्यात आले. असे असले तरी मुंबईमधील अनेक कब्रस्ताननी करोनामुळे मृत्यू झालेल्याच्या पार्थिवावर दफनविधी करण्यास मनाई केली आहे. मालाडमध्ये या वादातून एकाचा मृतदेह पुरण्याऐवजी दहन करावा लागला.

आता हे मृतदेह दक्षिण मुंबईमधील मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये आणण्यात येत आहेत. येथे करोनामुळे मृत्यू झालेल्या दहा जणांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आले. बडा कब्रस्तानच्या पश्चिमेला मरिन लाइन्स रेल्वे स्थानक, दक्षिणेला स. का. पाटील उद्यान, उत्तरेला काही निवासी इमारती, तर पूर्वेला दाटीवाटीने इमारती उभ्या असलेला चिराबाजार परिसर आहे. बडा कब्रस्तानमध्ये पार पडलेल्या या दफनविधींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बडा कब्रस्तानच्या खालून गेल्या आहेत. दफन केलेल्या या पार्थिवांमुळे भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने धोका होण्याच्या भीतीने रहिवाशांना ग्रासले आहे. या पुढे बडा कब्रस्तानमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे दफनविधी करू नये अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात पालिकेच्या सी विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता योग्य ती काळजी घेऊन हे दफनविधी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मृतदेहांचे दफनही शक्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार, करोनाचे विषाणू हवेत संचार करत नाहीत. ते रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकल्यातून पसरतात. त्यामुळे मृतदेहाचे दहन करणेच गरजेचे नाही, दफन केले तरी चालेल. स्थानिक आवश्यकतेनुसार कोणत्या प्रकारे मृतदेहाची विल्हेवाट लावावी हे ठरवावे. मृतदेहाचे दहन किंवा दफन करण्याआधी घरातील व्यक्ती मृतदेहाचा चेहरा पाहू शकतात. मात्र मृतदेहाला कोणत्याही प्रकारे स्पर्श करता येणार नाही. तसेच मृतदेहाला स्पर्श होईल किंवा त्याच्या जवळ जावे लागेल असे अंत्यसंस्काराचे कोणतेही विधी करू नयेत. मृतदेहापासून करोना संसर्गाची लागण झाल्याचे अद्याप तरी कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.