कमला मिल कंपाऊंडमध्ये शुक्रवारी दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. निष्काळजीपणा झाला असेल तर दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे

कमला मिलमधील ट्रेड टॉवरमधील ‘वन अबव्ह’ या पबमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले होते. इमारतीच्या गच्चीवर सुरु करण्यात आलेले हे पब अनधिकृत असल्याचा दावा केला जात आहे. तर या पबच्या बांबू आणि ताडपत्रीच्या छताविरोधातही तक्रार करण्यात आली होते, असे वृत्त समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ‘वन अबव्ह’च्या चालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून महापालिकेनेही पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

कमला मिलमधील आगीवरुन सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली असून शुक्रवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देत आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना आदित्य म्हणाले, फायर ऑडिट होणे गरजेचे होते. जर निष्काळजीपणा झाला असेल दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. याबाबत सविस्तर तपास केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

इमारतीच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मांडली होती. या संकल्पनेला भाजपचा विरोध होता. यामुळे सुरक्षेचा प्रश्न तसेच लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना त्रासही होऊ शकतो, असे भाजपचे म्हणणे होते. कमला मिलमधील आगीच्या घटनेने गच्चीवरील हॉटेलवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून गच्चीवरील हॉटेलचे आदित्य ठाकरेंचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत आदित्य ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.