मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील आग लागलेले हॉटेल कमिश्नरच्या मुलाचे आहे, असा दावा खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कमला मिल कंपाऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. कमला मिल कंपाऊंड आणि फिनिक्स मिल या मृत्यूचा सापळा असून या अनधिकृत बांधकामांना महापालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

कमला मिल कम्पाऊंडमधील आगीचे पडसाद शुक्रवारी लोकसभेतही उमटले. खासदार अरविंद सावंत आणि खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभेत आगीचा मुद्दा उपस्थित केला. सोमय्या म्हणाले, ट्रेड हाऊसमधील ते पब अनधिकृत असल्याची माहिती मला मिळाली आहे. या पबकडे कोणतीही परवानगी नव्हती. कमला मिल कंपाऊंड आणि फिनिक्स मिल या ठिकाणी हीच समस्या आहे. राज्यातील नगरविकास खात्याला या मिलमधील रेस्तराँचे फायर ऑडीट करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मिल म्हणजे मृत्यूचा सापळाच असल्याची टीका त्यांनी केलाी. फरसाण कारखान्यातही आग लागून १२ कामगारांचा मृत्यू झाला. वारंवार अशा घटना घडत असून मुंबई महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी फायर ऑडिट करत नाही, असा आरोप त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांच्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील भूमिका मांडली. आगीत ११ महिलांचा मृत्यू झाला. एवढी मोठी दुर्घटना झाली, पण या सर्व मिलमध्ये निवासी आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स झाले. तिथे रेस्तराँ कसे सुरु झाले, त्यांना परवानगी कोणी दिली, असा प्रश्न त्यांनी विचारला. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. हॉटेल कमिश्नरच्या मुलाचे आहे, असा आरोप त्यांनी केला असला तरी त्या अधिकाऱ्याचे नाव मात्र त्यांनी जाहीर केले नाही.

वाचा: मुलीसोबत ‘ती’चा शेवटचा डिनर; मुलगी बचावली

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर आरोप केला. कमला मिलमधील आगीसाठी ठाकरे कुटुंबीयच जबाबदार आहे. रेस्तराँना सुरक्षेचे नियम पाळण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या पण त्या पाळल्या गेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला. मुंबईकरांना अशा घटनांची सवय झाली आहे. आपण मुंबईकर म्हणून मूर्ख आहोत. या अशा घटना झाल्या की एक चौकशी समिती बसते आणि नंतर सगळेजण ही घटना विसरून जातात, असे त्यांनी सांगितले.

BLOG: गल्लाभरू मानसिकतेचे १४ बळी