मुंबईतल्या डोंगरी भागात कौसर बाग ही इमारत कोसळली. ही इमारत कोसळून १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तळमजल्यासह चार मजल्यांची ही इमारत आहे. ही म्हाडाची इमारत होती, विकासकाकडे या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती. तरीही इमारत का पडली? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. इमारत सकाळी साडेअकरच्या सुमारास पडली आहे. ही इमारत पडली तेव्हा भलामोठा आवाज झाला आम्हाला आधी वाटलं की भूकंपच झाला, हे सांगताना प्रत्यक्षदर्शींना अश्रू अनावर झाले होते. मानवी साखळी तयार करून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. कारण अत्यंत चिंचोळ्या गल्लीत ही इमारत आहे.

जमेल त्या प्रकारे मदत आणि बचावकार्य करण्यात येत आहेत. कारण या ठिकाणी रस्ते अरूंद आहेत त्यामुळे लोकांना हातात दगड आणावे लागत आहेत. मानवी साखळी तयार करुन बादल्यांमध्येही दगड आणले जात आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस हे शक्य तेवढी मदत करत आहेत. दरम्यान या दुर्घटनेबाबत माहिती देताना माहिती देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. कौसर बाग इमारतीच्या शेजारच्या इमारतीत असलेल्या महिलाही घाबरल्या आहे. साडेअकरा वाजता इमारत कोसळली, आमच्या भागातले लोक धावले. एक वाजल्यानंतर प्रशासनाचे लोक आले असा आरोप इथल्या महिलांनी केला आहे. इमारती कमकुवत झाल्या आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे असाही आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा आहे मात्र तसं होताना दिसत नाही असा संतापही लोकांनी व्यक्त केला आहे.

भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून प्रशासनाने पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. स्थानिकांनी आपल्या परिने मदत कार्य सुरू केलं आहे. मन हेलावून टाकणाऱ्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्यानंतर या ठिकाणी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. ढिगारा उपसण्याचं काम अत्यंत शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. चिंचोळ्या गल्ल्या असल्याने हातानेच ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. या इमारतीत १० ते १२ कुटुंबं वास्तव्यास होती. त्यामुळे ४० ते ४५ जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे.