दिवाळी सणाच्या काळातच रुग्णालयात राहण्याची वेळ आलेल्या कोविड रुग्णांसाठी एक आनंददायी बातमी आहे. रुग्णालयात उपचार सुरु असले तरी त्यांना घरचा फराळ चाखता येणार आहे. मुंबईतल्या अनेक रुग्णालयांनी आणि कोविड केअर सेंटर्सनी रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णांसाठी घरुन फराळ पाठवण्यास परवानगी दिली आहे. काही रुग्णालये तर आयसोलेशन वॉर्डही दिवाळीनिमित्त फुलांनी सजवणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

संपूर्ण मुंबईमध्ये ५,७०० पेक्षा अधिक कोविडचे रुग्ण विविध क्वारंटाइन सेटर्स आणि रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यांपैकी १,२०० पेक्षा अधिक रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल आहेत. आयसीयूत दाखल रुग्णांसाठी दिवाळीनिमित्त जास्त काही करता येण्यासारख नसलं तरी त्यांना कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. कारण इथे नातेवाईकांना प्रवेश देणं हा मोठा धोका ठरु शकतो.

वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयातील आहारतज्ज्ञांकडून रुग्णांसाठी आवश्यक आहाराच्या मागणीप्रमाणे चकल्या, बेसणाचे लाडू जेवणात देण्याबाबत विचार सुरु आहे. तसेच बीकेसीतील जम्बो कोविड-१९ सेंटरमध्ये ५६० उपचार सुरु असलेल्या रुग्णांना चकलीचे बॉक्स, शंकरपाळ्या आणि रव्याचे लाडू उपलब्ध होणार आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांकडून येथे लक्ष्मी पुजनाचे आयोजनही करण्यात आलं आहे. या कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी ही माहिती दिली.

त्याचबरोबर एस. एल. राहेजा रुग्णालयातही दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या रुग्णालयात ३७ कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांसाठी फराळ पाठवण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास नाही त्यांच्यासाठी पाठण्यास परवानगी देण्यात आली आहे. इथले मेडिकल डिरेक्टर डॉ. हिरेन अंबेगावकर म्हणाले, “रुग्णांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल बिर्याणी, पराठा, रायता, मोतिचूरचे लाडू देण्यात येणार आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना राजगिऱ्याचा हलवा, चकली आणि ढोबळी मिरची आणि पनीरची भूर्जी असे पदार्थ देण्यात येणार आहेत.”