30 September 2020

News Flash

बाजार सावरता सावरेना!

एरवी १२ महिने सदैव गजबजलेल्या मुंबईतील क्रॉफर्ड, मंगलदास आणि मनीष मार्केटमध्ये सोमवारीही गजबज होती.

५० दिवसांनंतरही मुंबईतील मोठय़ा बाजारपेठांमध्ये नोटाबंदीचा त्रास कायम

५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला बुधवारी ५० दिवस पूर्ण होत आहेत. ‘मला ५० दिवस द्या; परिस्थिती बदलेल’ असे आवाहन पंतप्रधानांनी त्या वेळी केले होते. त्यांचा दावा खरा ठरतोय का, हे उघड करणारी ही विशेष वृत्तमालिका आजपासून..

एरवी १२ महिने सदैव गजबजलेल्या मुंबईतील क्रॉफर्ड, मंगलदास आणि मनीष मार्केटमध्ये सोमवारीही गजबज होती. पण त्या गजबजाटात नेहमीचे चैतन्य पुरते हरवलेले दिसले. गेल्या ८ नोव्हेंबरपासून अशा वातावरणाला तोंड देणाऱ्या या मुंबईतील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये नोटाबंदीच्या ४८ व्या दिवशीही परिस्थिती बदललेली नाही. येथील व्यवहार ज्या नोटांनिशी सर्वाधिक चालायचे, त्याच नोटा चलनातून बाद झाल्याने उडालेला गोंधळ कमी म्हणून की काय, गेले दीड महिना केंद्र सरकारकडून दररोज जारी केल्या जाणाऱ्या नवनवीन नियमांमुळे येथील व्यापाऱ्यांची पुरती भंबेरी उडताना दिसत आहे. शे-पाचशेच्या नोटांचा दुष्काळ आणि दोन हजारच्या नोटांच्या सुटय़ांचा प्रश्न यामुळे येथील व्यवहार गेल्या दीड महिन्यांपासून गडगडलेले आहेत.

क्रॉफर्ड मार्केट

क्रॉफर्ड मार्केटमधील महात्मा जोतिबा फुले मंडईतील अनेक भाजी विक्रेत्यांकडे पेटीएमचे भित्तिपत्रक पाहायला मिळते. मात्र पेटीएमने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असल्याचे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितले. काही प्रमाणात ग्राहकांची संख्या पूर्वपदावर येत असली तरी पाचशेची खरेदी करणारा ग्राहक आता तीनशेची खरेदी करीत आहे. तर मालाची खरेदी करताना होणारा सर्व व्यवहार चेकने केला जातो, असे क्रॉफर्ड मार्केटमधील भाजी विक्रेते रामचंद्र भालेकर यांनी सांगितले. ग्राहकांचे सामान घेऊन फिरणाऱ्या पाटीवाल्यांचा व्यवसायही आजपावेतो बसलेलाच आहे. येथील एशियाटिक ड्राय फ्रूटमध्ये गेले तीन ते चार वर्षांपासून स्वाइप मशीनने व्यवहार केला जातो. नोटाबंदीनंतर स्वाइप मशीनचे ग्राहक २० टक्क्यांनी वाढल्याचे रजत भयानी यांनी सांगितले. तर येथील फळांच्या मंडईत गेली २२ वष्रे चहाचे दुकान चालविणाऱ्या शोहेब कुरेशी यांनी नोटाबंदीच्या फटक्यानंतर आपल्याकडील पाच कामगार कमी केल्याचे सांगितले. ‘७ ते २४ डिसेंबर या १७ दिवसांत पेटीएमद्वारे फक्त ३८३ रुपयांचा व्यवहार झाला,’ असे कुरेशी भिंतीवरील पेटीएमच्या पत्रकाकडे बोट दाखवून सांगत होते. फळबाजारात रोजगारासाठी आलेल्या छोटय़ा विक्रेत्यांना आपल्या गावी, कुटुंबीयांना पैसे पाठवणे अशक्य झाले आहे. गेली सहा वष्रे येथे व्यापार करणाऱ्या रहिम शेख यांच्याकडे आलेल्या ग्राहकाने १८० रुपये किलो सफरचंद घेऊन २००० रुपयांची नोट देऊ केली. मात्र शेख यांच्याकडे सुट्टे पसे नसल्यामुळे त्यांनी ग्राहकांना अधिक खरेदी करावयास सांगितली. त्यावर ग्राहकानेही २००० रुपयांचे सुट्टे करण्यासाठी १०० रुपयांचे पेरू घेतले. ग्राहक सुटू नये यासाठी शेख यांनी २००० रुपयांची नोट बाजारभर फिरवून सुट्टे करून दिले. ‘पण असे किती दिवस चालणार?’ हा त्यांचा प्रश्न होता.

मंगलदास मार्केट

गुजरात आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त असलेल्या मंगलदास या कापडाच्या बाजारपेठेत नोटाबंदीच्या निर्णयाचे तोंड भरून कौतुक होत असले तरी, जेव्हा व्यवसायाचा विषय निघतो तेव्हा, नोटाबंदीचा फटका बसल्याचे हे व्यापारही कबूल करतात. ‘३०० रुपयांच्या खरेदीवर ग्राहक २००० रुपयांची नोट देतो. मात्र प्रत्येक वेळी १७०० रुपयांचे सुट्टे पसे नसतात. त्यात बाजारात ५०० रुपयांच्या नोटांची संख्या कमी असल्यामुळे १०० रुपयांचे सुट्टे द्यावे लागतात,’ असे मंगलदास मार्केटमधील कन्हैयालाल जैन यांनी सांगितले. मंगलदास मार्केटला लागूनच असलेल्या बँक ऑफ बडोदाने व्यापाऱ्यांसाठी मोफत स्वाइप मशीन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिनाभरानंतरही मशीन मिळाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येथील काही व्यापाऱ्यांनी दुसऱ्या बँकेतून ही मशीन खरेदी केली आहे. मात्र अन्य बँकांचे मशिन असल्यामुळे दीड टक्क्यांचा अधिभार सोसावा लागतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मनीष मार्केट

सुमारे १९५० पासून इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री होणाऱ्या मनीष मार्केटमध्ये एरवी नाताळ आणि नवीन वर्षांच्या दिवसात मोठय़ा प्रमाणात खरेदी होते. मात्र यंदा मोबाइल विक्रेत्यांचे नववर्ष स्वागत सुनेसुने ठरणार आहे. सध्या ग्राहक अशी मोबाइल किंवा तत्सम खरेदी करण्यापेक्षा पसे घरातच जमा करून ठेवत आहे. दररोज बदलणाऱ्या नियमांमुळे अडीअडचणीला घरात पसे राहावेत, यासाठी खरेदी करण्यापेक्षा सर्वसामान्यांचा कल पसे साठविण्याकडे झाला आहे, असे या मार्केटमध्ये  दुकान चालविणारे विक्रेते रफिक कुरेशी यांनी सांगितले. येथील अनेक विक्रेत्यांनी पेटीएम सुरू केले आहे. मात्र त्याच्या वापराचे प्रमाण खूप कमी आहे. एका आठवडय़ाला पेटीएमने खरेदी करणाऱ्यांची संख्या ६ ते ७ इतकीच आहे, असे अहमद शेख या विक्रेत्याने सांगितले. या नोटाबंदीमुळे सुमारे ५० ते ६० टक्केपरिणाम झाला आहे. गेले अनेक दिवस डबघाईला आलेला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2016 2:47 am

Web Title: mumbai largest market face trouble after 50 days of demonstration
Next Stories
1 वाढत्या प्रवासी संख्येला तुटपुंज्या फेऱ्यांची ठिगळे!
2 पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी वाऱ्यावर!
3 महाविद्यालयांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर
Just Now!
X