मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये करोनाचा धोका गडद होत चालला आहे. आवाहन करूनही घरात न बसणाऱ्या नागरिकांमुळे मुंबईत, तर तबलिगी अनुयायांमुळे नवी दिल्लीत धोक्याची घंटा वाजू लागली आहे. मात्र मुंबईने चाचण्यांबाबत दिल्लीवर आघाडी घेतली आहे.

आतापर्यंत परदेशातून आलेल्या आणि मुंबईतील सुमारे नऊ लाखांहून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. तर कस्तुरबा रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात तब्बल ९३११ जणांची करोनाविषयक चाचणी करण्यात आली. सुरुवातीला केवळ कस्तुरबा रुग्णालयात होणाऱ्या करोनाविषयक चाचणीची सुविधा अन्य पालिका रुग्णालयांसह खासगी प्रयोगशाळांमध्येही उपलब्ध करण्यात आली. तपासणीअंती पालिकेने सुमारे ५१६८ जणांना घरातच वेगळे राहण्याची सूचना केली आहे. तर विविध पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयित रुग्णांची संख्या २४२७ इतकी आहे. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेत त्यांच्यासाठी पालिका रुग्णालयात १०३०, सरकारी रुग्णालयांमध्ये ६८५, तर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये ९० अशा १,८०५ खाटा उपलब्ध करण्यात आल्या. आता रुग्ण आढळल्यानंतर संबंधित इमारत वा परिसर प्रतिबंधित करण्याची पावले उचलण्यात येत असून आतापर्यंत मुंबईतील सुमारे २४१ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.   दिल्लीतील बाधित रुग्णांची संख्या ३८६ वर पोहोचली असून सहा जण मृत्युमुखी पडले आहेत. तबलगींच्या  कार्यक्रमामुळे नवी दिल्लीत गुरुवारी एका दिवसात १७६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले.   दिल्लीत आतापर्यंत सुमारे ३२७३ करोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ३९९ जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

काळजी घेतल्यामुळे..

मुंबईत मोठय़ा प्रमाणावर करोना संशयितांच्या चाचण्या करण्यात येत असून त्यामुळे बाधितांची संख्या अधिक दिसत आहे. मात्र नवी दिल्लीतील नागरिकांच्या चाचण्यांचे प्रमाण तुलनेत कमीच आहेत. त्यामुळे दिल्लीतील बाधितांचा नेमका आकडा अद्याप उजेडात येऊ शकलेला नाही.

तुलनात्मक प्रमाण..

मुंबईमध्ये करोनाचा मुकाबला करताना घराघरात फिरून करोनाबाधित, संशयितांचा कसून शोध सुरू असून आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक व्यक्तींच्या करोनाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या नवी दिल्लीत पार पडलेल्या तबलगींच्या कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर तेथे व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे गरजेचे होते. मात्र दिल्लीमधील अवघ्या तीन हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.