मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला होता. तो आता दुरूस्त करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वडाळा ते सीएसएमटी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू होते. अखेर सकाळी आठ वाजेच्या सुमारास बिघाड दुरुस्त करुन सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. पण, यामुळे हार्बरमार्गावरील लोकल उशीराने धावत आहेत.  अशातच सकाळी साडेअकरा वाजेपासून हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मेगा ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यान अप व डाऊन मार्गावरील उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द राहतील. तसेच ठाणे ते पनवेल, बेलापूर ट्रान्स हार्बर आणि नेरुळ ते खारकोपर दरम्यान दोन्ही मार्गावरील आणि पनवेल ते अंधेरी लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. ठाणे ते वाशी, नेरुळ आणि बेलापूर ते खारकोपर फेऱ्या पूर्ववत असतील.