मंबईच्या मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर रविवार, 15 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माटुंगा ते मुंबई सेंट्रलमध्ये स. १०.३५ ते दु. २.३५पर्यंत मेगाब्लॉक आहे. या कालावधीत सर्व जलद लोकल सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल स्थानकात धीम्या मार्गावरून जातील. त्यामुळे काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते भायखळा अप धीम्या मार्गावर स. ११.२० ते दु. ४.२०पर्यंत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे घाटकोपर येथून जाणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल स. १०.५८ ते दु. ४.२४पर्यंत विद्याविहार ते भायखळ्यापर्यंत अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना कुर्ला, सायन, माटुंगा, परळ स्थानकावर दोनवेळा थांबा दिला जाईल. त्यानंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावरून जातील. अप धीम्या लोकल विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी स्थानकांत थांबणार नाहीत. या स्थानकांवर जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना घाटकोपर, कुर्ला, परळ, भायखळा स्थानकांवरून प्रवास करता येईल. सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या सर्व लोकल स. ११ ते सायं. ६पर्यंत किमान १० मिनिटे उशिराने धावतील. घाटकोपर येथील नवीन पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी येथे शनिवारी मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ६.४५पर्यंत सहा तासांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे काही मेल, एक्स्प्रेस गाड्या खंडित केल्या जाणार आहेत.

याशिवाय हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर स. ११.१० ते दु. ४.१०पर्यंत ब्लॉक आहे. या दरम्यान सीएसएमटी ते पनवे, बेलापूर, वाशी सेवा स. १०.३४ ते दु. ३.३९पर्यंत खंडित राहील. तसेच, पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल स. १०.२१ ते दु. ३.४१पर्यंत खंडित राहील. या मार्गावरील प्रवाशांसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलसाठी विशेष लोकल चालवल्या जातील.