मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर आज (दि.२२) ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान जम्बो मेगा ब्लॉक आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकापर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुरुस्ती आणि तांत्रिक कमासाठी पश्चिम रेल्वेवर जम्बो, तर मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर लोकल फेऱ्या सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावतील.

मध्य रेल्वे

कुठे – माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग

कधी – स. १०.३० ते दु. ३ पर्यंत.

परिणाम – ब्लॉक काळात माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावरील सेवा डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. तसेच या गाडय़ा शीव ते मुलुंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. याशिवाय ठाण्याहून अप जलद मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – बोरिवली ते भाईंदर अप, डाऊन धिमा मार्ग.

कधी – स. ११ ते दु. ३.

परिणाम – धिम्या अप आणि डाऊन मार्गावरील गाडय़ा गोरेगाव/बोरिवलीहून वसई रोड स्थानकापर्यंत धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही गाडय़ा रद्द करण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या गोखले पुलाच्या गर्डरच्या चाचणीसाठी २१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० ते २२ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अंधेरी स्थानकाच्या दक्षिण दिशेने रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी जोगेश्वरी किंवा मिलन उड्डाणपुलाचा वापर करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

हार्बर मार्ग

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्ग.

कधी – स. ११.१० ते दु. ४.१० पर्यंत.

परिणाम – या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे-अंधेरी-गोरेगाव स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कुल्र्याहून वाशी/ बेलापूर/पनवेलसाठी विशेष गाडय़ा सोडल्या जाणार आहेत.