उशिराने लोकल गाडय़ा धावत असल्याने बुधवारी डोंबिवलीत रेल्वे रोखून धरणाऱ्या महिला प्रवाशांनी गुरुवारी रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला. गुरुवारी सकाळी फलाट क्रमांक पाचवरील नियोजित लोकल २५ मिनिटे उशिरा आल्याने प्रवासी संतापले.
महिलांच्या आंदोलनाचा बुधवारचा अनुभव गाठीशी असल्याने सकाळपासूनच फलाट क्रमांक पाचवरील महिला डब्याजवळ मोठय़ा संख्येने रेल्वे पोलिसांना तैनात करण्यात आले होते. लोकल उशिरा धावत असल्याने प्रवाशांकडून पुन्हा काही गडबड होऊ शकते हे लक्षात येताच महिला तसेच इतर प्रवासी रेल्वे मार्गात उतरणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी घेताना पोलीस दिसत होते. या परिस्थितीतही लोकल वेळेवर येत नाही याची जाणीव होताच महिलांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. महिलांनी आक्रमकपणे रेल्वे प्रशासनाचा निषेध सुरू करताच पुरुष प्रवाशांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. या वेळी रेल्वे पोलीस अधिकारी प्रवाशांना शांत राहण्यासाठी आवाहन करीत होते.
लोकल वेळेवर सोडल्या नाही तर एक दिवस रेल्वे प्रशासनाला मोठय़ा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांना देत होते.