News Flash

मुंबईकरांना मोठा दिलासा! एक फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल

मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती

संग्रहित छायाचित्र

अनेक महिन्यांपासून लोकल सेवेअभावी हेळसांड होत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विशिष्ट वेळांच्या निर्धारित करून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.

करोनामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. हळूहळू लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांची हेळसांड होत होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेळेच्या काही नियमांसह सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे :

सर्वसामान्यांना कधी प्रवास करता येणार?

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे.

कधी प्रवास करता येणार नाही?

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

कार्यालयांच्या वेळा बदलणार?

सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. मुख्य सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कार्यालयीन वेळा बदलण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलेलं आहे. या बाबतीतली सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.

उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा

मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 1:03 pm

Web Title: mumbai local service will open for common people bmh 90
Next Stories
1 मुंबईत एक्स्प्रेस हायवेवर एसटी उलटली; चालक फरार
2 फडणवीस सरकारच्या निर्णयावरील स्थगिती मागे
3 आरक्षित खाटा कमी करण्याचा विचार करा